आंगनवाडी सेविकांच्या हक्कांसाठी राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन,भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव

केज/प्रतिनिधी
देशातील आंगनवाडी सेविकांना श्रमिक म्हणून वैधानिक मान्यता,किमान वेतन,सामाजिक सुरक्षा व पेन्शन यांसारखे मूलभूत हक्क मिळावेत,या मागणीसाठी दि.३१ डिसेंबर २०२५ पासून भारतीय जनता मज़दूर संघ यांच्या वतीने राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.हा उपक्रम औपचारिक किंवा प्रतीकात्मक नसून, संविधानिक अधिकार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठीचा गंभीर लोकशाही प्रयत्न असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
देशभरातील सुमारे २७ लाख आंगनवाडी सेविका गेल्या अनेक दशकांपासून माता -बालकपोषण,सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक कल्याणाची जबाबदारी सातत्याने पार पाडत आहेत.मात्र आजही त्यांना श्रमिक दर्जा,किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षे पासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकाळ नियमित व नियंत्रित स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ मानधनधारक स्वयंसेवक न मानता श्रमिक म्हणून मान्यता देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असताना ही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांनी सांगितले की,या प्रश्नांच्या निराकरणाची अपेक्षा सध्याच्या सरकारकडूनच असून,संघर्षाची भूमिका न घेता संविधानिक व संवाद आधारित मार्गाने हा पत्र आंदोलन राबविण्यात येत आहे.
या आंदोलनाअंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय,श्रम व रोजगार मंत्रालय,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच माननीय पंतप्रधान यांना पत्र व ज्ञापन सादर करण्यात येणार आहेत. दबाव निर्माण करणे हा उद्देश नसून,धोरण,कायदा आणि प्रत्यक्ष परिस्थिती तील तफावत अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालया च्या निर्देशांनुसार श्रम- सन्मान सुनिश्चित करण्या साठी सकारात्मक पावले उचलली जावीत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील बौद्धिक वर्ग, शिक्षणतज्ज्ञ,धोरण विशेष तज्ञ आणि विचारवंत नागरिकांनी याविषयाकडे भावनिक नव्हे तर कायदेशीर,संविधानिक व नीतिगत दृष्टिकोनातून पाहून न्याय्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रातही हे अभियान राबविण्यात येत असुन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.तरी सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके, महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.



