नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या – खा. रजनीताई पाटील

केज/प्रतिनिधी
चार दिवसापासून बीड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर खा. रजनीताई पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. पाऊस,नैसर्गिकआपत्ती मुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्याला तात्काळ मदतीची गरज आहे. नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना खा. पाटील म्हणाल्या की, शासनाने तत्परतेने कार्यवाही केली नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल.त्यामुळे प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांमधून तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने मदत देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून सर्व स्तरांवर लढा देण्याचा निर्धार खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव बांधील असून, नुकसान भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.



