हृदयद्रावक घटनेनंतर युवकांचा ऐतिहासिक संकल्प : केजमध्ये डीजे संस्कृतीला ‘बाय-बाय’! आकाश लांडगेच्या निधनानंतर समाज भावनेने घेतला निर्णय

केज/प्रतिनिधी
डीजे/डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन आकाश संतोष लांडगे या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच बीड जिल्ह्यात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना,केज शहरातील युवकांनी सामाजिक जबाबदारीची जाण दाखवत एक महत्त्वपूर्ण आणि आदर्श संकल्प केला आहे.
समर्थ नगर भागातील आकाश लांडगे यांच्या श्रद्धांजली सभेत भावूक झालेल्या युवकांनी पुढील काळात केज शहरात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात डीजे/डॉल्बी न लावण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करून घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.
🔹 मान्यवरांनी केला संकल्पाचा गौरव
या श्रद्धांजली कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड, ह.भ.प.बाळासाहेब गेंधले महाराज,माजी नगरसेवक शिवाजी आप्पा हजारे, हनुमंत भोसले सर,भाई मोहन गुंड,रणजित खोडसे, अशोक सोनवणे, विजय आरकडे,लक्ष्मण जाधव, धनंजय घोळवे, संजय कोरडे,विजय वनवे ,विजय आंडिल, सुलेमान काजी,कवी गायकवाड,शिवाजी घुले साहेब,पंकज तेलंग, राजेभाऊ कुचेकर,अभी लोखंडे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून आकाश ला श्रद्धांजली वाहिली.
युवकांनी घेतलेल्या ‘डीजेबंदी’ संकल्पाला सर्व मान्यवरांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि या निर्णयाचे भरभरून कौतुक केले.
🔹 सामाजिक संदेशाचा नवा ध्वनी
एका निष्पाप तरुणाच्या निधनाने समाजासमोर ध्वनीप्रदूषण आणि हृदयविकाराचा गंभीर मुद्दा अधोरेखित झाला आहे. केजच्या युवकांनी घेतलेला हा निर्णय इतर शहरांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श ठरू शकतो.
“उत्सव साजरा करूया… पण दुसऱ्यांच्या जीवाशी खेळून नव्हे!”असा संदेश या संकल्पामधून स्पष्टपणे उमटला आहे.



