वरपगाव येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती पुष्पादेवी वैजनाथराव देशमुख यांचे पुणे येथे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील वरपगावचे भूमिपुत्र व महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागातून (सध्याचा जलसंपदा विभाग) अधीक्षक अभियंता (सुप्रिंटेंडिंग इंजिनियर) म्हणून सेवानिवृत्त झालेले कै. वैजनाथराव हनुमंतराव देशमुख यांच्या पत्नी श्रीमती पुष्पादेवी वैजनाथराव देशमुख यांचे सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे येथे दुःखद निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या. त्या अत्यंत कुटुंबवत्सल व प्रेमळ होत्या.
वरपगाव व परिसरातील अनेकांना त्यांनी नोकरी व व्यवसायासाठी खूप प्रोत्साहन दिले तसेच आवश्यकतेनुसार मदत, सहकार्य व मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या मागे पुणे येथे स्थित मुलगा निवृत्त वैद्यकीय अधिकारी व सध्या कृषी व बांधकाम क्षेत्रात कार्यरत डॉ. अविनाश देशमुख तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे स्वतःचे इंग्लिश मीडियम स्कूल असलेले आणि स्वतःच्या सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ.राहुल देशमुख अशी दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा मुलगा कै.अतुल देशमुख हा पुणे येथे बांधकाम व्यवसायात होता त्याचे गतवर्षी निधन झाले.कैलासवासी पुष्पादेवी देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असून एक नातू डॉक्टर, तीन नातू इंजिनीयर तर दोन नाती आर्किटेक्ट आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री आमदार श्री. प्रकाशदादा सोळुंके यांच्या त्या मावशी होत तर शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील यांची कन्या त्यांची स्नुषा आहे. राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गजव्यक्तींशी कौटुंबिक नातेसंबंध असलेल्या कै.पुष्पादेवी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण करण्यात आली आहे.



