
केज/प्रतिनिधी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवीन क्रांती यावी, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे,असा हेतू डोळ्या समोर ठेवून येडेश्वरी साखर कारखान्याची उभारणी केली.आजपर्यंत सर्वाधिक ऊसदर देण्याचे काम येडेश्वरीकारखान्याने केलेले असून यावर्षी देखील एफआरपीपेक्षा अधिकचा दर देऊ,असा शब्द खा.बजरंग सोनवणे यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांना दिला.
येडेश्वरी साखर कारखाना लि.युनिट नं.१,आनंदगाव (सा.), ता.केज येथील सन २०२५-२६ च्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी खा.सोनवणे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,गेल्या ११ हंगामा पासून येडेश्वरी साखर कारखाना सातत्याने प्रगतीचा ध्यास घेत कार्यरत आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे आज कारखान्याने उत्पादन, कार्यक्षमता आणि शेतकरी हितसंबंध या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमा तून परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर ऊस गाळप,योग्य दर,सेंद्रिय शेती व नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले.आगामी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासा साठी साखर, इथेनॉल, वीज उत्पादन आणि उपउद्योग यांच्या माध्यमा तून आणखी नवे प्रकल्प राबविण्याचा कारखान्याचा संकल्प आहे.आजवर येडेश्वरी कारखान्याने सर्व शेतकरी बांधवांचा ऊस वेळेत घेवून जाण्याचे काम केले आहे.
यावर्षी देखील सर्व शेतकऱ्यांचा हा कारखाना घेवून जाईल.शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण आल्यास कारखान्यावर यंत्रणेशी संपर्क करावा, असे आवाहनही खा. सोनवणे यांनी केले.या शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक,ऊस उत्पादक शेतकरी, नेतेमंडळी, विभागप्रमुख,खातेप्रमुख, कर्मचारी, वाहतूकठेकेदार, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसउत्पादकांना बोनसही देणार
येडेश्वरी साखर कारखान्याने आजवर बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे.यावर्षीही आपण चांगला दर देणार आहोतच,पण या कारखान्यावर माझ्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून यावर्षी आपण ऊस उत्पादकांना बोनस देण्याचा देखील विचार करत आहोत.शिवाय यापुढे कायमस्वरूपी शेतकऱ्यांना बोनस दिला जाईल,असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.



