वकील संरक्षणासाठी बार कौन्सिलचा ठराव दि. ३ नोव्हेंबर रोजी राज्यभर वकिलांचा एक दिवसीय न्यायालयीन कामकाजा वर बहिष्कार

मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने राज्यातील वाढत्या वकीलांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तीव्र भूमिका घेतली आहे. दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित ठरावानुसार, वकील संरक्षण कायद्याची मागणी अधोरेखित करण्यासाठी संपूर्ण राज्यातील उच्च न्यायालय,जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व वकील दि.०३ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयीन कामकाजा पासून अलिप्त राहून निषेध नोंदवणार आहेत.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॕड.अमोल सावंत,उपाध्यक्ष अहमदखान पठाण तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अॕड. आशिष देशमुख यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत वकीलांवर झालेल्या हल्ल्यांमुळे कायदा व्यवसायिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.काही वकिलांना या हल्ल्यांत प्राण गमवावे लागले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे अलीकडेच एका वकिलावर उलट तपासणी दरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत कौन्सिलने हा ठराव पारित केला.वकील वर्गाचा आत्मसन्मान, सुरक्षा आणि बार असोसिएशनचे स्वातंत्र्य यासाठी हा निषेध आवश्यक असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.कौन्सिलने सर्व जिल्हा आणि तालुका बार असोसिएशन यांना आवाहन केले आहे की,
दि.०३ नोव्हेंबर रोजी वकील संरक्षण विधेयका च्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाजा पासून अलिप्त राहावे, तसेच शांततामय मार्गाने जनतेचे लक्ष या मुद्द्याकडे वेधावे.स्थानिक पातळीवर प्रेस नोट काढून, शांततामय आंदोलन आयोजित करून हा निषेध व्यक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या आणि प्रतिक्रिया बार कौन्सिलकडे पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत.बार कौन्सिलच्या या ठरावाची प्रत मा.मुख्य न्यायाधीश आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अॕड.अमोल सावंत अध्यक्ष,अहमदखान पठाण उपाध्यक्ष,अॕड. आशिष देशमुख सदस्य, बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमुखाने हा ठराव मंजूर केला.वकील वर्गाच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी हा लढा पुढे चालू राहील,असा निर्धार बार कौन्सिलने व्यक्त केला आहे.



