न्यायसामाजिक

बीडच्या एकीचा केज पॅटर्न डॉ.संपदा मुंडे यांच्या हत्येविरोधात सर्वधर्म- सर्वपक्ष एकवटले;कॅन्डल मार्चमधून सडेतोड उत्तर

केज/ प्रतिनिधी

फलटण येथे बीड जिल्ह्याच्या लेकी व डॉक्टर असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा संतापाच्या ज्वाळांनी पेटला असून या भीषणकृत्याच्या निषेधार्थ केज शहरात अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळाली.जाती-पाती, पक्षभेद,धर्मभेद विसरून सर्व समाजघटक रस्त्यावर उतरले आणि न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार व्यक्त केला.

‘कॅन्डल मार्च’ ने प्रकटला संताप व ऐक्य

केज शहरातील बसस्टॅण्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर दि.२९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च मध्ये युवक,नागरिक, महिला,मुली यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. केजकरांनी शांततेच्या मार्गाने प्रचंड संताप व्यक्त करत बीडच्या लेकीला न्याय द्या अशी जोरदार घोषणाबाजी केली.

सर्व पंथ ,सर्व पक्ष ,सर्व समाज एकत्र बीड जिल्ह्याबद्दल जातीयवाद ,वादविवादा चा गैरसमज निर्माण करणाऱ्यांना केजकरांनी योग्य असे उत्तर देत दाखवून दिले की,अन्याया च्या विरोधात बीड एकत्र येतो.बीड जिल्ह्यातील एकीचा संदेश महाराष्ट्राने पाहावा

मान्यवरांची उपस्थिती या निषेध मोर्चात नगर पंचायतचे गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड,सुमंत धस,हनुमंत भोसले सर, भाई मोहन गुंड,पत्रकार बांधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बीडकरांचा संदेश :

बिहारशी तुलना करणारे थोडे तरी लाज बाळगा!गुंडगिरीचा शिक्का आमच्या संपूर्ण जिल्ह्यावर लावू नका!

कॅन्डल मार्च मध्येसहभागी झालेल्या नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,बीड हा कष्टकरी, मेहनती, प्रामाणिक आणि साध्या-भोळ्या,गरीब जनतेचा जिल्हा आहे. मूठभरांच्या वाह्यातपणा मुळे संपूर्ण जिल्ह्याला बदनाम करू नका!

केज पॅटर्न — एकीचा नवा आदर्श

डॉ.संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी केज शहराची एकजूट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. नागरिकांनी विश्वास व्यक्त केला की,बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा डाव कायमचा फसणार आहे.

एकाच लेकीसाठी उभ्या राहिलेल्या बीडकरांच्या या एकीचा ‘केज पॅटर्न’ कायम टिकणार आहे.  न्यायालयाने या प्रकरणात कठोर कारवाई करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!