बोगस वृत्तपत्राच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पत्रकारावर कारवाईची मागणी; केज तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यात अर्ज दाखल

केज/प्रतिनिधी
केज शहरात बोगस वृत्तपत्राच्या नावाखाली नागरिक, अधिकारी व कर्मचारी वर्गाची फसवणूक करणाऱ्या एका तोतया पत्रकारावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाबासाहेब अंबादास मस्के यांनी पोलिस निरीक्षक, स्वप्नील उनवणे पोलिस ठाणे केज यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे, फुले नगर परिसरातील तात्या गवळी नावाच्या व्यक्तीने (आर.एन.आय.) क्रमांक नसलेल्या एका ॲपच्या माध्यमातून बनावट वृत्तपत्र तयार करून खोट्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. सदर व्यक्ती स्वतःला पत्रकार असल्याचे भासवून समाजातील तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फसवणूक करीत असल्याचेही अर्जात नमूद आहे.
तसेच, त्या व्यक्तीने स्वाभिमानी पत्रकार संघ या नावाने एक बोगस संघटना स्थापन करून स्वतःला अध्यक्ष घोषित केले असून, त्या पदाचा गैरवापर करून विविध ठिकाणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच त्याने दीपावलीच्या निमित्ताने बनावट लेटरहेडच्या माध्यमातून आर्थिक उकळी केल्याचेही निदर्शनास आले आहे.
बाबासाहेब मस्के यांनी म्हटले आहे की, “अशा प्रकारच्या तोतया पत्रकारांच्या कृतींमुळे खऱ्या पत्रकारितेच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. समाजात तसेच प्रशासनात फसवणूक, गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.”
या घटनेमुळे केज शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला असून, स्थानिक नागरिक आणि पत्रकार संघटनांकडूनही अशा बोगस वृत्तपत्रांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे.



