अंबाजोगाईतील दोन मटका चालकांची एमपीडीए अंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा अवैध जुगार चालकांना दणका

अंबाजोगाई/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी,अवैध मटका जुगार व गुंडगिरीवर आळा घालण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संयुक्तमोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेत अंबाजोगाई शहरातील दोन कुख्यात मटका चालकां विरोधात एमपीडीए (Maharashtra Prevention Of Dangerous Activities Act) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशा नुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड यांनी सय्यद अन्वर सय्यद अजगर वय ४१,रा.खतीब गल्ली, अंबाजोगाई आणि चाँद इमाम गवळी वय ४४,रा. गवळीपुरा,अंबाजोगाई या दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला होता.तपासा नंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश जारी करत दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.
पोलीसांच्या गुप्त माहितीवरून दोन्ही आरोपींना २८ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आणि २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.या दोन्ही आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात मटका जुगार खेळवणे, धमक्या देणे,शिवीगाळ करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची सहा प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
या दोघांवर कलम ११० सीआरपीसी अंतर्गत पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती,मात्र त्यांचे वर्तन न सुधारल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भापोसे), अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शरद जोगदंड यांनी संयुक्तरीत्या केली.
अंमलबजावणीत स्थागुशा बीडचे पथक सहभागी झाले होते.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले की, भविष्यात अवैध जुगार, गुटका विक्री ,वाळू माफिया, काळाबाजार करणारे तसेच सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात MPDA व MCOCA कायद्या अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहील.



