
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याची लेक डॉ. संपदा मुंडे यांच्या निधना नंतर जिल्हा भरात शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण मराठवाडा हादरून गेला असून,डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध स्तरांवर मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच माजलगाव मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते श्री.रमेशराव आडसकर यांनी दि.२७ ऑक्टोबर रोजी सोमवारी मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.या भेटी प्रसंगी बोलताना श्री.रमेशराव आडसकर म्हणाले की, “बीड जिल्ह्याची ही लेक केवळ एका कुटुंबाची नव्हे,तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान होती.तिच्या निधनाने आपण सर्वजण व्यथित आहोत.
लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास वेगाने आणि निष्पक्षपणे व्हावा या साठी आम्ही प्रयत्नशील राहू.दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी,” असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांच्या सोबत जगदेश फरताडे, मनोहर तात्या डाके, मचिंद्रबप्पा झाटे, बालासाहेब बादाडे,दत्ता काका डाके सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
शोकाकुल मुंडे कुटुंबीयांनी या भेटी दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना न्याय मिळवण्यासाठी जनतेने साथ द्यावी,अशी विनंती केली.डॉ.संपदा मुंडे यांच्या अकाली निधनामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संताप व दु:खाचे वातावरण आहे. समाजातील विविध घटकांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी होत आहे.



