
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्यसभेच्या खासदार सौ.रजनीताई पाटील यांनी दि.२७ ऑक्टोबर रोजी सोमवारी मुंडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.या भेटी दरम्यान त्यांनी कुटुंबीयांनादिलासा देत,“आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी मी आणि काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे.येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात मी हे प्रकरण उपस्थित करणार असून,विरोधी पक्षनेते राहुल गांधी स्वतः हा विषय उचलून धरणार आहेत,” असे स्पष्ट केले.
खासदार सौ.रजनीताई पाटील यांनी सांगितले की,या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. बीड जिल्ह्यातील लोकांना या घटनेत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात साताऱ्याची टीम नव्हे,तर बीड मध्येच स्वतंत्र एसआयटी स्थापन करून तपास करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली.या प्रसंगी त्या म्हणाल्या की,जेव्हा कुंपणच शेण खातंय, तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा? असा तीव्र सवाल त्यांनी उपस्थित करत राज्यातील प्रशासनावर निशाणा साधला.पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,राज्यात डबल इंजिन सरकार असतानाही आपल्या मुली आणि महिला सुरक्षित नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. गृहखात्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
खासदार सौ. रजनीताई पाटील यांनी या भेटीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली असून, राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून या घटनेचा निषेध नोंदवत न्यायाची मागणी केली आहे. डॉ.संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या संशयास्पद मृत्यूमुळे बीड जिल्ह्यात तीव्र संतापाचे वातावरण असून,सर्वच समाज घटकांकडून या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मागण्या वाढत आहेत.



