
केज/प्रतिनिधी
केज शहरातील जय भवानी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.ऐन दिवाळीच्या सणामुळे शहरात वाढलेल्या वाहतुकीचा ताण नागरिकांच्या सहन शक्तीचा अंत पाहू लागला.मात्र या ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी पोलिसांचा कुठेही मागमूस नव्हता,हे विशेष लक्षवेधी ठरले.वाहतूक कोंडी वाढत गेल्याने स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वतःच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान पत्रकारांनी केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता,त्यांनी “आमच्या कडे ८५ पोलिस आहेत, तुम्ही ट्रॅफिक विभागाच्या नंबरवर कॉल करत जा,” अशी उदासीन प्रतिक्रिया दिली.या उत्तरामुळे पत्रकार आणि नागरिकां मध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला असून, “पोलिसांना मदतीसाठी फोन करावा की नाही,हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर काही वेळाने ट्रॅफिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंतनागरिकांनीच कोंडी कमी करून रस्ता मोकळा केला होता.जय भवानी चौक हा केज शहराचा मध्यबिंदू असून येथून तीन प्रमुख मार्ग बीड,परळी आणि धारूर दिशेने जातात.
त्यामुळे या ठिकाणी दिवसभर मोठी रहदारी असते. सणासुदीच्या काळात वाहतूक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे होते,अशी नागरिकांची मागणी आहे.स्थानिक व्यापारी,नागरिक आणि वाहनधारकांनी वाहतूक विभागाच्या निष्काळजी पणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून,पोलिस प्रशासनाने तात्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी त्यांनी केली आहे.



