सामाजिक

अनाथ मुलांच्या भवितव्या साठी श्रीराम तांदळे यांचा पुढाकार,१० अनाथ मुलांना मिळाली सरकारी नोकरी

केज/प्रतिनिधी

अनाथ मुलांच्या हक्का साठी झटणाऱ्या श्रीराम तांदळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. नाशिक विभागातील विद्युत सहाय्यक पदा साठी निवड झालेले १० अनाथ उमेदवार अनेक दिवस नियुक्ती न मिळाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. काहींनी आत्महत्येचाही विचार केला होता.या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्रीराम तांदळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या मुलांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावला.नाशिक येथील संबंधित वीजविभागातील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात अनावश्यक विलंब होत होता.तांदळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न थेट वरिष्ठ पातळीवर नेला.पुणे महिला व बाल विकास कार्यालयात तसेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा विषय ठाम पणे मांडण्यात आला.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनी विभाग,महाराष्ट्र राज्य तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात तातडीने बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (नाशिकविभाग) यांना संबंधित १० अनाथ मुलांना नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व १० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून त्यांनी विद्युत सहाय्यक पदावर रुजू होण्यास सुरुवात केली आहे.या यशामुळे संबंधित मुलां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य व भविष्याची दिशा मिळाली आहे.

“अनाथ मुलांचे शिक्षण, पुनर्वसन व नोकरीच्या संधीसाठी मी सदैव कार्यरत राहीन.अशा मुलांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला निःसंकोच संपर्क साधावा,” असे आवाहन श्रीराम तांदळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना केले.या उपक्रमामुळे केवळ १० अनाथ मुलांचे आयुष्य बदलले नाही, तर समाजात सकारात्मकते चा व संवेदनशीलतेचा संदेशही पोहोचला आहे. श्रीराम तांदळे यांच्या पुढाकाराचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!