आशा स्वयंसेविका,गट प्रवर्तक यांच्या मागण्यां कडे शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन भाऊबीज भेटीवर मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय अपेक्षित,मोबाईल भत्ता वाढणार ; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्या साठी प्रस्ताव केंद्राकडे.

मुंबई/प्रतिनिधी

दि.१० ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार रोजी राज्या तील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या दीर्घ प्रलंबित मागण्यांकडे अखेर शासनाने सकारात्मक दृष्टीकोन दाखविला आहे.मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय आंदोलनानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाची आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर,आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे,सहसंचालक राजेंद्र भालेराव आणि राज्य समन्वयक स्वाती पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत शासनाने आशा व गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी आशांना भाऊबीज भेट देण्याबाबत मंत्रिमंडळ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून त्यावर सक्रिय पाठपुरावा केला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले.
आरोग्य आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या दालनातील बैठकीत मोबाईल रिचार्ज भत्ता १०० रुपयांवरून ३०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.याशिवाय नवीन मोबाईल फोन देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्षे करण्याचा प्रस्तावही पुनर्विचारात घेतला जाणार आहे.आशांना ऑनलाईन कामासाठी सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.इतर विभागांनी अशा प्रकारची सक्ती केल्यास त्याबाबतआयुक्त स्तरावरून पत्रव्यवहार केला जाईल.थकीत मानधन तात्काळ देणे, ‘लाडकी बहिण’ योजने अंतर्गत मोबदला मिळवून देणे,बायोमेट्रिक हजेरीची सक्ती न करणे तसेच पीएचसी स्तरावरील हजेरी मधून सूट देणे यासह अनेक मागण्यांवर निर्णय प्रक्रियेला वेग येणार असल्याचे संकेत या बैठकीत मिळाले.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे मानधन पुढील तीन दिवसांत जमा होणार असून,आशा व गट प्रवर्तकांना आरोग्य विभागात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी शासनाकडून आदेश जारी केले जातील.दरम्यान, कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
कृती समितीच्या निवेदनातील प्रमुख मागण्या —
पाच महिन्यांचे थकीत मानधन तात्काळ देणे
दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन मिळावे,5G मोबाईल,सिम कार्ड व अमर्यादित डेटा पॅक मिळे पर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार
दिवाळीपूर्वी ५ हजारांची भाऊबीज भेट
- गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जा आणि ३५ हजारांचे किमान वेतन
- सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे किंवा ५ हजार निर्वाह भत्ता
- बायोमेट्रिक हजेरी रद्द
- प्रसूती व आजारपणा साठी भरपगारी रजा
- सेवेत असताना मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची भरपाई
या मागण्यांसाठी आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला.बीड सह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. शिष्टमंडळात कॉ.राजू देसले,भगवान देशमुख, नीलेश दातखिळे, दत्ता देशमुख,वैशाली खंदारे, पुष्पा पाटील, आरमायटी इराणी, ज्योती उराडे,चंद्रा कांबळे,मधुकर कदम आदी मान्यवर सहभागी झाले होते.
या घडामोडीं वर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे म्हणाल्या की, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित होत्या. शासनाने आता सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट मिळेल आणि इतर मागण्यांनाही गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.”शासनाच्या या भूमिकेमुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक वर्गात मोठा दिलासा व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



