राष्ट्रसंत श्री भगवानबाबा यांच्या जयंती निमित्त पाटोद्यात ठेवलेल्या शिवमहापुराण कथेला प्रचंड गर्दी

पाटोदा ( प्रतिनिधी )
प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे गेल्या १४ वर्षांपासून राष्ट्रसंत श्री भगवानबाबा यांच्या जयंतीचे पाटोदा तालुका राष्ट्रसंत श्री भगवानबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते मात्र या वर्षी दिनांक १५/९/२०२५ ते २१/९/२०२५ पर्यंत दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री समाधान महाराज शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन समितीचे केले असुन या शिवमहापुराण कथेला प्रचंड प्रमाणात गर्दी होत असुन पाटोदा सह संपूर्ण तालुक्यातून महीला भगिनी व नागरिक मंडळी येत असुन या शिवमहापुराण कथेचा लाभ घेत आहेत असुन या महाशिवपुराण कथेचे आयोजन खुपच सुंदर केले असल्याचे राष्ट्रसंत श्री भगवानबाबा जयंती उत्सव समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कथा सांगताना श्री समाधान महाराज शर्मा म्हणाले की शिवमहापुराण कथा आत्मशांती,धर्म जागृती आणि समाजोन्नतीचा महामार्ग आहे.या कथेतील प्रत्येक प्रसंग जीवनाला योग्य दिशा देणारा आहे.भगवान शंकराची उपासना केवळ वैयक्तिक कल्याणासाठी नसून, संपूर्ण समाजाच्या मंगलासाठी आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे कार्य त्याच अध्यात्मिक तत्त्वज्ञानाशी जोडलेले आहे.त्यांनी सदैव समाजातील दुर्बल, वंचित,पीडित वर्गासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली.त्यांचे स्मरण म्हणजे सेवाभाव, करुणा आणि एकतेचा दीप प्रज्वलित ठेवणे होय असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले.
या सोहळ्यासाठी ९० बाय २०० फूटांचा विशाल वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाटोदा शहरातून निघणारी भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण असणार आहे. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक,झांज पथक आणि आकर्षक रथांमधून निघणारी ही शोभायात्रा हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर शिवमहापुराण कथेची सांगता व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.
भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी आयोजक राष्ट्रसंत श्री भगवानबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात येत आहे. शहरभर उभारलेल्या स्वागत कमानी, प्रकाशमाळा आणि धार्मिक घोषवाक्यांनी सजलेले रस्ते पाटोदा नगरीत भक्तिमय वातावरण अधिकच खुलून दिसत आहे.
दररोज हजारो भाविकांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे. कथा संपल्यानंतर महाप्रसाद दररोज होत आहे.महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोयी करण्यात आली आहे.आयोजकांनी भाविकांच्या सेवेसाठी पाणी,वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे.
समाजातील विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला,’ असे प्रवचन आपल्या रसाळ वाणीत सादर केले. यावेळी श्रीक्षेत्र संत मीराबाई संस्थान महासांगवीचे मठाधिपती महंत राधाताई महाराज आईसाहेब, रामकृष्ण इंघवे बापू महाराज, सत्यभामा बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उत्सवाने पाटोदा नगरीत केवळ धार्मिकता नव्हे तर एकता, बंधुभाव आणि समाजकारणाचे अद्वितीय उदाहरण उभे केले आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या कार्याची प्रेरणा आणि शिवमहापुराण कथेतील दिव्य संदेश, या दोन्हींचा संगम भाविकांना अध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा ठरत आहे.



