रेल्वेसाठी जनतेचा सालगडी म्हणून पाठपुरावा केल्याचा आनंद: खा.सोनवणे बारा वर्षात ९९ तर बारा महिन्यात वडवणीपर्यंत रेल्वे मार्गाचे काम केल्याचा खा.सोनवणेंकडून उल्लेख

बीड/प्रतिनिधी
बीडला रेल्वे आलीच पाहिजे’, ही घोषणा लहानपणी ऐकली होती. बीड जिल्ह्यातील अनेकांनी रेल्वेसाठी आंदोलने केली, ३०० आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. यातील काहींनी जेल भोगले. प्रकल्प मंजुरीनंतर मागील बारा वर्षात केवळ ९९ किलोमिटर रेल्वे मार्ग पुर्ण झाला होता, मात्र आपण खासदार झाल्यानंतर बारा महिन्यात ६७ किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण करून पुढे वडवणीपर्यन्त हायस्पीड ट्रायल रन यशस्वी झाला आहे. या कामासाठी सततचा पाठपुरावा आवश्यक असून मी जनतेचा सालगडी म्हणून हे काम करत आहे. आपल्याला रेल्वेचे श्रेय अजिबात घ्यायचे नसून आज रेल्वे बीडला येत असून जिल्ह्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याचा उल्लेख खा.बजरंग सोनवणे यांनी म्हटले.
बीड येथील शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी खा.बरजंग सोनवणे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, पिंटू ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.सोनवणे म्हणाले, आजपासून बीडला रेल्वे सुरू होत आहे. बीडला रेल्वे यावी, यासाठी अनेकानी योगदान दिले आहे. रेल्वेसाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. बीड रेल्वेसाठी लढा देणारे सर्व स्वातंत्र्य सैनिक, रेल्वे कृति समितीमधील सर्व सदस्य यांच्या सततच्या लढ्याला यश आले.
मी खासदार झालो त्यावेळी रेल्वे अंमळनेरपर्यंत आलेली होती. खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिले प्राधान्य हे रेल्वेला दिले. पहिली बैठकही रेल्वे विभागाची घेतली. प्रकल्पासाठी येत असलेले अडथळे व उपाययोजना बाबत माहिती घेतली. संसदीय पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांचे आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे बोर्ड अध्यक्ष सतिषकुमार यांच्याकडे सतत पाठपुरावा करत रेल्वेबाबतीत येणाऱ्या अडचणी सांगून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही सहकार्य लाभले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना व त्यांच्या विभागाशी सातत्याने बैठका घेत संपर्क ठेवला.
रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे मुंबई व आहिल्यानगर कार्यालय येथे वारंवार बैठका घेतल्या. ठेकेदार कोण आहे हे न पाहता काम गतीने होण्याकडे लक्ष दिले, यामुळे रेल्वे कामाला गती आली. अडचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी व स्थानिक नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढला. हे करताना तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, अविनाश पाठक आणि आता विवेक जॅान्सन तसेच रेल विभागाचे आर. के. यादव , लोळगे व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी चांगले काम केले. रेल्वे मंजूरी मिळाली तेव्हा आपण या प्रक्रियेत नव्हतो, आंदोलनातही नव्हतो, परंतु खासदार म्हणून मला रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करून त्या कामांना गती देता आली. याच पाठपुराव्यामुळे बारा महिन्यात वडवणीपर्यन्त काम पुर्ण होऊ शकले. बीड जिल्ह्याला रेल्वेची भेट देणे हे माझ्यासाठी एक शेतक-याचा मुलगा म्हणून केवळ काम नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारा आनंदाचा क्षण आहे, असे खा.बजरंग सोनवणे म्हणाले.
रेल्वेची चुकीच्या पध्तीतीने कामे
आपण खासदार होण्याआधी झालेली रेल्वेची कामे चुकीच्या पध्दतीने झालेली आहेत. अनेक ठिकाणी रेल्वेपुलाखाली पाणी साचते. अनेक ठिकाणी पुलच चुकीचे बांधले. तर हायस्पिड चाचणी होईंपर्यत विद्यूतीकरणाच्या कामांकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार झालेले आहेत. परंतु माझ्या कार्यकाळात चुकीची कामे होणार नाहीत, यासाठी मी लक्ष ठेवून आहे, असे खा.बजरंग सोनवणे म्हणाले.
२०२६ मध्ये काम पुर्ण
जिल्ह्यात १० ठिकाणी नवीन रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपास लवकरच सुरू करण्यात येतील. बीड शहरातील बार्शी नाका येथे रेल्वे थांब्याचा प्रस्ताव पुढे पाठविला आहे.बीड शहराजवळील ढोले वस्ती येथे अंडरपासचे काम निश्चित करण्यात येईल. रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू असून मार्च २०२६ पर्यंत अहिल्यानगर-परळी रेल्वे मार्ग सुरू होईल.
* बीडकरांसाठी रेल्वेचे फायदे *
- -शेतीमाल, भाज्या, फुले, धान्य त्वरित देशभर पोहोचवणे सोपे.
- – मुंबई-पुणे या मोठ्या बाजारपेठेशी जोडणी.
- – पर्यटन, तीर्थाटन, व्यापार, व्यवसायासाठी नवे दार उघडले.
- – बीड-पुणे -मुंबई-नगर या भागात राहणाऱ्या लेकी-बाळींसाठी माहेरी येणे सोपे.
- – मुलांसाठी ‘झूक झूक गाडी’ने मामाच्या गावाला जाण्याची नवी सोय.
- – साठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे बीडमध्ये पोहोचली.
खा.सोनवणेंकडून यांचाही उल्लेख बीड रेल्वेची पहिली मागणी तत्कालीन खासदार गंगाधर आप्पा बुरांडे यांनी केली. स्व.खा. केशरकाकु क्षीरसागर व स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी लोकसभेत वारंवार आवाज उठवला. रेल्वे कृती समिती, स्वातंत्र्यसैनिक, आणि जनआंदोलन करणारे सर्व मान्यवर आदिंचा संघर्ष यशस्वी झाला. आतापर्यंत ३०० आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बीडला रेल्वे आली आहे, असा उल्लेख खा.सोनवणे यांनी केला.
ओल्या दुष्काळाची केली मागणी बीड जिल्ह्यात दि.१४-१५ आणि १६ रोजी सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता सरकारने पंचमाने न करता बसता शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. मी अतिवृष्टीग्रस्तांची भेट घेतली असून त्यांचे दुख: पाहवत नाही, असेही खा.सोनवणे म्हणाले.



