
बीड/प्रतिनिधी
मागील तीन दिवसा पासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, विशेषतः केज तालुका आणि आसपासच्या भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसामुळे उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून,शेतकरी अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना तातडीने हेक्टर 1 लक्ष रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याची जोरदार मागणी केली आहे.
शेतीचे झालेले नुकसान पाहता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी. फक्त आश्वासने न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 1 लक्ष रुपये थेट मदत जमा होणे अत्यावश्यक आहे,” असे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील अनेक भागांत सोयाबीन, कापूस,भाजीपाला, मूग,ऊस आणि तूर यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत.काही ठिकाणी मातीचा थर वाहून गेल्याने शेताची गुणवत्ता देखील खराब झाली आहे.यामुळे आगामी हंगामावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जनावरांचे देखील नुकसान.
पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे जनावरे, शेती उपकरणे, साठवलेले धान्य व खताचे साठे देखील नष्ट झाले आहेत.अनेक कुटुंबांना आपल्या शेतवस्त्यांवरून गावात स्थलांतर करावे लागले आहे.सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. बाजीराव ढाकणे यांनी पुढे सांगितले की, “सरकारने या संकटाची गांभीर्याने दखल घेऊन, जिल्हा प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत कार्य सुरू करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फक्त आधार नव्हे,तर थेट मदतीची गरज आहे.”
या भागात अजूनही हवामान ढगाळ असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाने मदत कार्याची गती वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



