हनुमंत पिंपरी येथे कायदे विषयक जन जागरण शिबिर उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती,केज व वकील संघ,केज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमंत पिंपरी येथील श्री. ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कायदे विषयक जन जागृती शिबिराचे सकाळी 9-30 वाजता आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठविधिज्ञ डी.टी.सपाटे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती केजचे प्रतिनिधी श्री.रोडेवाड, तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी,अॕड.एस.व्ही.मिसळे,अॕड.यु.बी. निंगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिबिरात पशु वैद्यकीय पशुधन पर्यवेक्षक श्री.डी.एस.चवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पंचायत समिती सदस्य श्री.रोडेवाड यांनी शासनाच्या विविध योजना,व स्वच्छता विशेषतः शेतकऱ्यांच्या व हागणदारीमुक्त गाव योजना ग्रामविकासाशी निगडित योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी अॕड.यु.बी.निंगुळे यांनी बालकांचे आधिकार याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली.तर अॕड.एस. व्ही.मिसळे यांनी हुंडा आणि जाती भेद,गरीबी निर्मूलन योजना २०१५ तसेच लिगल सर्व्हिसेस फॉर चिल्ड्रन स्किम २०२४ याबाबत मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ विधिज्ञ डी.टी.सपाटे यांनी ट्रॅफिक नियमांचे पालन,समाजातील महिलांची सुरक्षा, गोपनीयता याविषयी मार्गदर्शन करत ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन करत व्यसनमुक्ती विषयक मोलाचा सल्ला दिला.
या कायदेविषयक शिबीर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॕड.एस. व्ही.मिसळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.बी.चाळक यांनी मानले.कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व्ही.बी. चाळक व ग्रामसेवक पतंगे यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.