निरपेक्ष सेवाभाव, अध्यात्म आणि मानव कल्याणाच्या कार्याचा गौरव ; श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांना मठ सोनपेठ ‘तपोरत्नम’ पुरस्कार जाहीर


सोनपेठ/प्रतिनिधी
अध्यात्म,समाजप्रबोधन आणि मानव कल्याणा च्या क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून निरपेक्ष भावनेने कार्य करणारे सोनपेठ येथील पूज्य श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांना प्रतिष्ठेचा ‘तपोरत्नम’ पुरस्कार जाहीर झाला आहे.काशीचे जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आदेशानुसार श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
आज दि.१४ जून रोजी सायंकाळी ६ -००वाजता सोलापूर येथील वीर तपस्वी मंदिरात जगद्गुरू पंचाचार्य यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सन २००० मध्ये सोनपेठ मठावर विराजमान झाल्यानंतर श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी अध्यात्मिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.सन २००२ पासून त्यांनी देशातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये श्रावणमास अनुष्ठानांची परंपरा सुरू केली. त्यानंतर मराठवाड्या तील विविध गावांमध्ये श्रावणमास अनुष्ठानांच्या माध्यमातून अध्यात्मिक जागृतीचे कार्य सुरू आहे.
महाराजांच्या मार्गदर्शना खाली दरवर्षी वैदिक बालसंस्कार शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण उपक्रम तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
‘बेटी बचाव,बेटी पढाव’ अभियानांतर्गत १११ मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या ठेवी जमा करून त्यांनी स्त्रीशिक्षण आणि महिला सक्षमीकरणा साठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच वैदिक परंपरा जतन करण्यासाठी आणि भावी पिढीसाठी पुरोहित तयार करण्याच्या उद्देशाने वैदिक प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन केले जाते.
पंचवीस वर्षांच्या कालावधीत अनेक अडचणींवर मात करत त्यांनी सोनपेठ मठाचा सर्वांगीण विकास घडवून आणला असून अध्यात्म,संस्कार आणि समाजसेवेचे प्रभावी केंद्र म्हणून मठाची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या बहुआयामी, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना ‘तपोरत्नम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याने चिंचकर परिवार कळंब, तसेच भक्त परिवार, शिवाचार्य परंपरेतील अनुयायी आणि सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



