गुन्हेगारीसामाजिक

मंडळ अधिकारी व तलाठ्याच्या निलंबना साठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,मयत व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून जमिन बोअरवेल हडपल्याचे प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांची मागणी

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे.मयत व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून बोगस दस्तऐवजांच्या आधारे वडिलोपार्जित जमीन व बोअरवेल हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी तत्कालीन मंडळ अधिकारी लहू भीमराव केदार व तत्कालीन तलाठी शरद जानकीराम राठोड यांच्यावर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाईची मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मौजे वाघोली ता.धारूर येथील रहिवासी कै.आबासाहेब बाबुराव गव्हाणे यांचे दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले असून सह दिवाणी न्यायाधीश, धारूर यांनी दि.१४ डिसेंबर २०२१ रोजी वारस प्रमाणपत्रनिर्गमित केले आहे.मात्र,वाघोली येथील सर्व्हे नं.२४६ मधील ६१ गुंठे वडिलोपार्जित जमीन ही कै.आबासाहेब व त्यांचे भाऊ मधुकर बाबुराव गव्हाणे यांच्या सामायिक मालकीची असून त्यात सामायिक बोअरवेल आहे.मूळ तक्रारदार मधुकर गव्हाणे यांच्या धारूर पोलिस ठाण्यात दि.५ जून २०२६ रोजी दिलेल्या तक्रारी नुसार , पुतण्या अशोक आबासाहेब गव्हाणे याने वडिलोपार्जित जमिनी तील व बोअरवेल मधील कायदेशीर हिस्सा हडपण्यासाठी मुद्रांक विक्रेता,नोटरी वकील, तलाठी व मंडळ अधिकारी,साक्षीदार यांच्या संगनमताने कट रचला.दि.१० जुलै २०२४ रोजी मयत आबासाहेब गव्हाणे यांच्या नावाने हस्ते खुद्द असे लिहून मुद्रांक विक्रेते आर.एन.मोरे यांच्याकडून 100 रु.चा बॉण्ड खरेदी केला. त्यावर मयत व्यक्तीची इंग्रजी स्वाक्षरी दाखवली

त्याच दिवशी नोटरी ॲड. मंगल एच.नेहरकर यांनी कोणतीही शहानिशा न करता मयत व्यक्तीच्या नावाने बोअरवेल नोंदी साठी शपथपत्र नोटरी केले.तत्कालीन तलाठी शरद जानकीराम राठोड यांनी दि.१८ जुलै २०२४ रोजी मयत व्यक्तीच्या नावाचा अर्ज स्वीकारला. अर्जावर इंग्रजीत स्वाक्षरी असून वर दि.१७ जुलै २०२४ व खाली दि. १८ जुलै २०२६ अशा विसंगत तारखा आहेत.

तत्कालीन मंडळ अधिकारी लहू भीमराव केदार यांनी दि.२७ आॕगष्ट २०२४ रोजी कोणतीही शहानिशा न करता फेरफार क्र.१०८२ मंजूर केला.यामुळे मुळ तक्रारदार मधुकर बाबुराव गव्हाणे यांचा बोअरवेलमधील कायदेशीर हिस्सा संपुष्टात आला.

संघटनेच्या पाच प्रमुख मागण्या 

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत

  1. तत्कालीन मंडळ अधिकारी लहू केदार व तलाठी शरद राठोड यांची सखोल खाते निहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे.
  2. या दोन्ही अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८,३३६,३३७, ३३८,६१,१९८
  3. [लोकसेवकाने खोटा दस्त तयार करणे] अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश धारूर पोलीस ठाण्यास द्यावेत.
  4. मुद्रांक विक्रेता आर. एन.मोरे यांचा परवाना रद्द करावा.
  5. नोटरी ॲड.मंगल एच. नेहरकर यांचा नोटरी परवाना रद्द करण्यासाठी भारत सरकारकडे शिफारस करावी.
  6. फेरफार क्र. १०८२ तात्काळ रद्द करून पूर्वीची स्थिती कायम करावी.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच मयताला जिवंत केले

महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच मयताला जिवंत दाखवून जमीन हडपण्यास मदत करणे हा नीचपणाचा कळस आहे.बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अशा प्रकारे बळकावल्या जात असतील तर सर्व सामान्य शेतकऱ्याने न्याय कुणाकडे मागायचा?सात दिवसात आरोपी अधिकाऱ्यांचे निलंबन झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू ,असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!