चिंचाळा येथे शॉर्टसर्किट ने घर जळून खाक ; १८ क्विंटल कापसासह संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात



वडवणी/प्रतिनिधी
वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या भीषण आगीत यशवंत लक्ष्मणराव कुलकर्णी यांच्या घरातील १८ क्विंटल कापसासह सर्व जीवनाश्यक वस्तू जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या आगीत कुलकर्णी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून,त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,चिंचाळा येथील रहिवासी यशवंत लक्ष्मणराव कुलकर्णी यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किट झाले आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले.आग एवढी भीषण होती की, घरातील सदस्यांना काही समजण्याच्या आतच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कुलकर्णी यांनी घरात साठवून ठेवलेला अंदाजे १८ क्विंटल कापूस या आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे. कापसासोबतच घरातील अन्नधान्य,कपडे,सोन्या- चांदीचे दागिने,महत्त्वाची कागदपत्रे आणि सर्व संसारोपयोगी साहित्य जळून कोळसा झाले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली,तरी कुलकर्णी यांच्या आयुष्यभराची पुंजी या आगीत नष्ट झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला,परंतु तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे कुलकर्णी कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून,प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी चिंचाळा ग्रामस्थांकडून केली जात आहे.



