मान्सून वेळेपूर्वीच धडकणार!महाराष्ट्रातही लवकर आगमनाची शक्यता,स्कायमेटचा अंदाज

मुंबई/प्रतिनिधी
राज्यात सध्या भीषण उन्हाळा आणि अंगाची लाहीलाही करणारा उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.यंदाचा मान्सून अंदमानात आपल्या ठरलेल्या वेळेच्या आधीच धडकण्याची शक्यता आहे.खाजगी हवामान संस्था ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून च्या प्रवासाला वेग मिळाला असून लवकरच अंदमान निकोबार बेटांवर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती
हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ मे २०२६ दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.याहवामान प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार असून मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मोठी चालना मिळेल.यापूर्वी मान्सूनचे आगमन १४ ते २२ मे २०२६ दरम्यान होईल असा अंदाज होता,मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्हे गडद झाली आहेत. भारतीय हवामान विभागानेही १४ ते २० मे २०२६ दरम्यान अंदमान समुद्रात नैर्ऋत्य वारे सक्रिय होतील,असा दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्रातील आगमनाचे समीकरण
साधारणपणे,मान्सून दाखल एकदा अंदमानात झाला की तिथून कोकणा पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे २१ दिवसांचा कालावधी लागतो.जर अंदमानात मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली,तर महाराष्ट्रातही यंदा पावसाचे आगमन वेळेवर किंवा काही दिवस आधीच होण्याची दाट शक्यता आहे.यामुळे भीषण उकाड्याने त्रस्त असलेल्या महाराष्ट्र वासीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.



