केज येथे भाजपाच्या प्रशिक्षण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद, त्याग,निष्ठा,सेवाभाव, सर्मपण राष्ट्रभक्ती हेच खरे भाजपाच्या कार्यकर्त्याचे अलंकार – भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी

केज/प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या विशेष लक्षामुळे हे प्रशिक्षण नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.वसुंधरा माध्यमिक विद्यालय, केज येथे आयोजित या प्रशिक्षण शिबिरात भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम राख होते.
यावेळी बोलताना राम कुलकर्णी म्हणाले की,भाजपाचा कार्यकर्ता हा स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारा नसून त्याग, निष्ठा,सेवाभाव आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांनी सजलेला असतो.‘प्रथम राष्ट्र,नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा विचार अंगीकारून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे.ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारसरणी,संस्कृती आणि तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे.समाजाचा पक्षावर वाढलेला विश्वास टिकवून ठेवण्यासाठी शुद्ध आचरण, सकारात्मक भूमिका आणि जनसंपर्क महत्त्वाचा आहे. कार्यकर्ता हा पक्ष मजबुतीचा पाया असून शिस्तबद्ध,नियोजनबद्ध आणि सेवाभावातून काम केल्यास समाज मान्यता निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच,कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद, गटतट टाळून एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.तोंडात साखर,डोक्यात बर्फ आणि पायात चक्र हे सक्रिय कार्यकर्त्याचे खरे अलंकार असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी काळात पक्ष व नेतृत्वावर निष्ठा ठेवून कठोर परिश्रम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
सुमारे चाळीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी कार्यकर्ता कसा असावा व त्याची कार्यपद्धती कशी असावी यावर परखड मार्गदर्शन केले.बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न अर्थात नगर बीड परळी रेल्वे तो आपल्या नेत्या मा.ना. पंकजाताई साहेब आणि डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या मुळेच मार्गी लागला.वर्तमान लोकप्रतिनिधी यांना तिळाएवढे श्रेय जात नाही.केंद्रात आपलं सरकार आल्यानंतर रात्रंदिवस या प्रश्नासाठी आपल्याच नेतृत्वाने काम केले आणि हा प्रश्न सोडूनच दाखवला.
केज विधानसभा मतदार संघात सौ.नमिता ताई मुंदडा यांनी मागच्या सहा वर्षात कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली.हे कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेत संपर्क करून समजून सांगायला हवे असे देखील त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वासुदेव नेहरकर यांनी केले.मंडळ अध्यक्ष भगवान केदार व संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एस.आर.आय.प्रमुख अॕड.शरद इंगळे यांच्या परिश्रमातून या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिराला अपेक्षित सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



