धाराशिव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांची टोळी केज पोलिसांनी पकडली

केज/प्रतिनिधी
केज येथील बसस्थानक परिसरात अंधारात लपून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेली धाराशिव जिल्ह्यातील चौघांची टोळी केज पोलिसांनी पकडली असून,लाकडी काठी,कोयता व कार जप्त केली आहे.तेचौघेही आरोपी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील असून याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे,जमादार सुभाष तांबारे,पोलीस नाईक विष्णू नागरगोजे,वाहन चालक रामहरी शिंदे हे मंगळवार दि.३१ मार्च रोजी मध्यरात्री १२-३० वाजण्याच्या दरम्यान केज शहरात गस्त घालीत असताना व बसस्थानक परिसर चेक करीत असताना बस स्थानकाच्या बाजूच्या एका कोपऱ्यामध्ये अंधारात एम.एच.१४ एफजी ८८७८ ही कार उभी केल्याचे दिसून आल्याने त्यांनी जवळ जाऊन कारच्या काळ्या रंगाच्या काचेतून आत पाहिले असता चौघे जण संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून बसले होते.त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने कारची झडती घेतली असता कारमध्ये कोयता,काठी दिसून आली.
ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाल्याने भूम जि.धाराशिव जिल्ह्यातील प्रेम शिवाजी गायकवाड रा.सुकता, वैभव भागवत गायकवाड रा.इंदीरानगर, भुम,सुमीत प्रभाकर गायकवाड,हर्षद मिलींद चंदनशिवे दोघेही रा. भोगलगांव या चार तरुणांना ताब्यात घेतले. तर पोलिसांनी कारसह कोयता,लाकडी काठी जप्त केली.पोलीसनाईक विष्णू नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली केज पोलिस करीत आहेत.


