९४ वर्षीय प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी केला मनाचे श्लोक पुस्तकाचा हिंदी अनुवाद

अंबाजोगाई/प्रतिनिधी
प्रख्यात शिक्षणतज्ञ प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ या पुस्तकाचे (श्लोकाचे) हिंदी भाषेत अनुवाद केला आहे.हे पुस्तक श्री व सौ खुर्जेकर (विद्यानंद प्रकाशन पुणे) यांनी प्रकाशित केले असून सज्जनगड येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.९४ वर्षीय वेदकुमार वेदालंकार यांनी याआधी तुकाराम गाथा,समग्र ज्ञानेश्वरी (१८ अध्याय) या ग्रंथाचा देखील हिंदी अनुवाद केला आहे. साधारणतः दोन वर्षापुर्वी वेदकुमार वेदालंकार यांच्या पत्नीचे निधन झाले.ते दुःख विसरून व ती पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक याचे पठण व मनन सुरू केले.
याचा परिणाम असा झाला की, मनाला शांतता वाटू लागली मग त्यांच्या मनात विचार आला की, याचा हिंदी अनुवाद व्हायला हवा.यातील बारीक सारीक गोष्टी जलदगतीने पूर्ण झाल्या व अवघ्या काही महिन्यातच मनाचे श्लोक या पुस्तकाचा हिंदी अनुवाद डॉ.अदिती वेदालंकार भुसारी यांच्या मदतीने तयार झाला.व रामदास स्वामी यांच्या चरणी वेदालंकार यांची सेवा रुजु झाली असून त्यांनी हिंदी अनुवाद केलेल्या मनाचे श्लोक हे पुस्तक सज्जनगड येथे अर्पण केले आहे.
परंडा तालुक्यालील डोणगांव च्या समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांच्या समाधी चरणी देखील हा अनुवाद अर्पण केला आहे.जयहिंद ग्रुपच्या वतीने वेदकुमार वेदालंकार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य मेजर एस.पी. कुलकर्णी, सौ.अपर्णा कुलकर्णी, पियुष वेदालंकार, सौ.सायली वेदालंकार, सुमंत वेदालंकार सौ.मनीषा वेदालंकार,दिग्विजय वेदालंकार,प्रा.डॉ.गणेश पिंगळे,प्रा.रमेश सोनवळकर,पत्रकार राहुल देशपांडे आदी उपस्थित होते.



