
केज/प्रतिनिधी
पंचायत समिती कार्यालय केज येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे सुरू करण्या साठी तसेच ती गावागावात गतिमान व पारदर्शक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली.
शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत सुलभ दळणवळणाची सुविधा निर्माण होणे ही काळाची गरज आहे.पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी होणारा त्रास,उत्पादन बाजारपेठेत पोहोचवताना येणाऱ्या अडचणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यां सोबत या योजनेची कार्यपद्धती अधिकसोपी, सुलभ व कालबद्ध करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.गावनिहाय प्राधान्यक्रम,तांत्रिक मानके,निधी नियोजन तसेच कामांच्या दर्जा बाबत स्पष्ट दिशा निश्चित करण्यात आली.तसेच ग्रामीण भागातील पाणंद व शेत रस्त्यांना क्रमांक देणे,अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करणे व त्याची एफ-१ मध्ये नोंद करणे आवश्यक असून संबंधित प्रस्ताव ग्राम पंचायत व महसूल विभागाने तहसील कार्यालय व केज पंचायत समितीकडे सादर करावेत,त्यानंतर समिती मार्फत मंजुरीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना राबविण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून शासनाचे कौतुक आहे.
याचबरोबर मातोश्री पाणंद रस्ते योजनाही सुरू राहणार असून या योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.मोठ्या प्रमाणात कामे प्रलंबित राहण्यामागे ऑनलाईन हजेरी प्रणाली,मस्टर काढण्यातील अडचणी, जिओ टॅगिंग प्रक्रिया, नवीन स्पर्श प्रणालीची अंमलबजावणी, ऑनलाईन इ-एमबी प्रशिक्षणाचा अभाव, रोजगार सेवकांचे असहकार्य तसेच स्थानिक कार्यालयातील दिरंगाई या बाबी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले.या त्रुटी दूर झाल्यास शेतकरी बांधवांना निश्चित दिलासा मिळेल.
या बैठकीस अंबाजोगाई चे नगराध्यक्ष श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा,समितीचे सचिव उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे साहेब, तहसीलदार राकेश गिड्डे केज,तहसीलदार विलास तरंगे अंबाजोगाई,बीड गट विकास अधिकारी तसेच तीनही तालुक्यांतील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



