केज मतदार संघातील दोन रस्त्यांच्या सुधारणे साठी २५ कोटींच्या निधीची तरतूद,आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

केज/प्रतिनिधी
केज मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय नियोजनात केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते कामा साठी २५ कोटींच्या निधी ची तरतूद करण्यात आली आहे.प्रस्तावित कामांनुसार धारूर, तांदळवाडी,उंदरी,कळम अंबा आणि होळ या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील ९-५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी रुंदीकरणा सह सुधारणा करण्यात येणार आहे.
या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.हा रस्ता सुधारण्यासाठी प्रदीर्घ काळापासून मागणी होत होती. त्याचप्रमाणे,अंबाजोगाई तालुक्यातील नागापूर, साकूड ते अंबाजोगाई या दरम्यानच्या १५ किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे ही रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम अर्थ संकल्पात प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.आ.नमिता मुंदडा यांनी या कामांसाठी संबंधित विभागांकडे सातत्याने मागणी लावून धरली होती.
या दोन्ही कामांची एकूण लांबी २४.५० किलोमीटर असून, राज्य महामार्ग आणि मुख्य जिल्हा मार्ग अंतर्गत ही विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. या रस्ते सुधारणेमुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून स्थानिक व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ.नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.



