सामाजिक

पत्रकार संघाचा उत्कृष्ट सेवेला मानाचा मुजरा ज्योती विलासराव आरकडे-मस्के यांना ‘उत्कृष्ट अधिपरिचारिका’ पुरस्कार प्रदान

केज/प्रतिनीधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा केज, राष्ट्रीय पत्रकार संघ, पुरोगामी पत्रकार संघ व सह्याद्री पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अधिपरिचारिका ज्योती विलासराव आरकडे -मस्के यांना उत्कृष्ट अधिपरिचारिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आरोग्य क्षेत्रात अनेक वर्षे निष्ठा, समर्पण आणि सेवा भावाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

ज्योती आरकडे-मस्के यांनी उपजिल्हा रुग्णालय केज,ग्रामीण रुग्णालय धारूर,ग्रामीण रुग्णालय भोकर जि. नांदेड तसेच जिल्हा रुग्णालय बीड येथील मोबाईल टीममध्ये महत्त्वपूर्ण सेवा बजावली आहे.शस्त्रक्रिया गृहात कार्य करताना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मोबाईल टीम सोबत जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयां मध्ये आयोजित शस्त्रक्रियांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

सध्या त्या स्त्री रुग्णालय, लोखंडीसावरगाव येथे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असून आता पर्यंत १० हजारांहून अधिक शस्त्रक्रियांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले आहे.यामध्ये गर्भ शस्त्रक्रिया,हर्निया, अपेंडिक्स,गर्भ पिशवी शस्त्रक्रिया,बाळंतपण तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा समावेश आहे.याशिवाय जवळ पास ५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी सहाय्यक म्हणून योगदान दिले आहे.

केज तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रां सह आडस,बनसारोळा, अंबाजोगाई येथील धानोरा ग्रामीण रुग्णालय तसेच धाराशिव जिल्ह्यातील वाशी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया मोहिमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. आरोग्य सेवेत रुग्णांप्रती असलेली बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि सातत्यपूर्ण सेवा या मुळेच त्यांना हा सन्मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना वेळेत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला आहे.हा पुरस्कार प्रदान करताना पत्रकार संघाला आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!