सामाजिक

चार तासांत केज शहर झाले चकाचक! केज शहरात स्वच्छता अभियानात १५०० श्री सदस्यांचा सहभाग डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

केज/प्रतिनिधी

स्वच्छता अभियानावर शासनस्तरावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो परंतु रेवदंडा जि. रायगड येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी दि. १ मार्च २०२६ रोजी केज शहरात सुमारे १५०० श्रीसदस्यांनी स्वच्छते साठी रस्त्यावर उतरून अवघ्या चार तासांत संपूर्ण शहर चकाचक केले.डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.केज नगरपंचायती च्या सहकार्याने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत केज शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.अभियानास छत्रपती शिवाजीमहाराज चौकातून सुरुवात झाली.

चौकाची योग्य आकर्षक रांगोळी काढून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला.पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉ. श्री.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव,तुळजापूर, लातूर,बीड,वाशी परिसरातून दीड हजार श्री सदस्य झाडू घेऊन रस्त्यावर स्वच्छतेसाठी उतरले.प्रतिष्ठानतर्फे सदस्यांना हातमोजे, मास्क आदी साहित्य पुरविण्यात आले होते. या अभियानासाठी केज नगरपंचायतीतर्फे १० घंटागाड्या,३० ट्रॅक्टर तसेच ३ जेसीबी उपलब्ध करून देण्यातआल्या होत्या.या महाअभियाना मध्ये सर्व सदस्यांनी चार तासांत सुमारे ८२ टन सुका कचरा व ४० टन ओला कचरा असा एकूण १२२ टन कचरा संकलित केला.जमा झालेला कचरा घंटागाड्यांमधून नियोजनबद्ध पद्धतीने उचलण्यात आला.

सकाळी ठीक सात वाजता केजच्या श्री छत्रपती शिवाजी चौक येथून केजच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड, केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजित ढोपे, रमेशराव आडसकर डॉ.हारुणभाई इनामदार, हनुमंत भोसले,फुलचंद भाऊ जाधव, सचिन मुळे व शहरातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली.

या महाअभियाना अंतर्गत केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भवानी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बालाजी मंदिर,जुने केज हनुमान मंदिर परिसर,कळंब रोड,धारूर रोड,कानडी रोड,उमरी रोड सह केज शहरातील रस्ते व प्रमुख शासकीय कार्यालये तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,न्यायालय व विश्रामगृह परिसर स्वच्छ करण्यात आले.

या महा स्वच्छता अभियानाने केज शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती होण्यास मदत झाली आहे.बाहेर गावचे नागरिक अत्यंत निष्ठा व श्रद्धेने आपल्या गावात येऊन स्वच्छता करताना पाहून केजच्या नागरिकांत स्वच्छतेबद्दल मोठी जनजागृती झाल्याचे दिसून आले.केज नगरपंचायत ने विशेष आभार पत्राद्वारे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!