जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी विधानसभेत आवाज उठविला याबद्दल केज वासियांच्या वतीने आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार

केज/प्रतिनिधी
केजच्या गरीब व सामान्यांच्या मुलामुलीं च्या उज्वल शैक्षणिक भविष्याचा सर्वोत्तम पर्याय असणारी व बंद पडण्याच्या मार्गांवर असणारी केजची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पुन्हा नव्याने सुरु करण्या साठी केजच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी शाळेचा मुद्दा विधानसभेत मांडून केजवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल केजवासिय व या शाळेच्या माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने अभिनंदन व आभार मानले आहेत.
केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही एकेकाळी शहरातील एकमेव वैभवप्राप्त शाळा होती.मात्र अलीकडील काळात खाजगी शिक्षण संस्थांचे वाढते वर्चस्व व केजच्या नागरिकांचे शाळेकडे नकळत झालेले दुर्लक्ष यामुळे शाळा मोडकळीस आली होती.
विद्यार्थी संख्या अभावी शाळा बंद करण्याचा निर्णय शासन स्तरावर चालू असतानाच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी शाळेच्या गतवैभवाचा इतिहास व सद्यस्थिती याबद्दल सोशल मीडिया वर जागृती केल्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी भाई मोहन गुंड,सुनिल हुलसूळकर,अभय कुलकर्णी,तय्यब शेख, गणेश सुरवसे व शेकडो माजी विद्यार्थी यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात भव्य मेळावा व प्रभातफेरी काढून शाळा पुन्हा नव्याने सूरु करण्याचा निर्धार केला आहे.शाळा पुन्हा नव्याने सुरु करण्या साठी जोरदार तयारी सूरू असून आता स्वतः आमदार नमिताताई मुंदडा यांनी पुढाकार घेवून शाळेला भेडसावणाऱ्या समस्या विधानसभा सभागृहात मांडल्याने आता येथील सामान्य व गरीब विद्यार्थ्यांसाठी या शाळेचे दरवाजे येत्या जून २०२६ पासून उघडणार आहेत.
आमदार नमिताताई मुंदडा यांनी शासन दरबारी शाळेच्या समस्या मांडल्याबद्दल त्यांचे दि.७ मार्च रोजी केज येथे आगमनाच्या निमित्ताने केज पंचायत समिती येथे त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून आभार व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले,भाई मोहन गुंड,समीर देशपांडे,पिंटू दांगट, अहमद इनामदार,जॅकी इनामदार यांनी कळवले आहे.



