शिवप्रेमींसाठी सचिन साखरे व गणेश काळदाते यांचा आदर्श सेवा उपक्रम

केज/प्रतिनिधी
शिवजयंती सोहळ्या निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार तथा चहा हॉटेल व्यावसायिक सचिन धनराज साखरे यांनी शिवप्रेमींसाठी चहा व शुद्ध पाण्याची उत्तम व्यवस्था करून समाजा समोर आदर्श निर्माण केला.समाज जाणिवेतून गेली अनेक वर्षे ते हा उपक्रम सातत्याने राबवत असून त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाडा दूध डेअरीचे मालक गणेश काळदाते यांनी मोलाचे सहकार्य केले.दोघांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू आहे. शिवजयंती सारख्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यात शिवप्रेमींसाठी विनामूल्य चहा व पाण्याचीव्यवस्था करणे ही केवळ सेवा नसून छत्रपतींच्या विचारांना अभिवादन करण्याची एक प्रेरणादायी कृती असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
यावर्षीची शिवजयंती डीजे मुक्त जयंती म्हणून साजरी करण्यात आल्या मुळे वातावरण अधिक उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध होते.तरुणाई सोबतच महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात होती. वाढलेल्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वृद्धिंगत झाली. सर्व स्तरातून अशीच शिस्तबद्ध,सांस्कृतिक आणि प्रेरणादायी शिवजयंती भविष्यातही साजरी व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सचिन साखरे आणि गणेश काळदाते यांनी सातत्याने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.मित्रपरिवार व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.समाजसेवेची ही परंपरा येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत त्यांच्या हातून अखंडपणे सुरू राहो, हीच सर्वांची मनापासून अपेक्षा व्यक्त होत आहे.



