सामाजिक

घरकुल लाभधारकाचे जन-जीवन विस्कळीत, प्रलंबित हप्ते तात्काळ द्यावेत,लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा – जीवन आबा हांगे

केज/प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास, आदी घरकुल योजनांतील लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तात्काळ द्यावेत तसेच संबंधित अभियंता व ऑपरेटर यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी,अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी जीवन आबा हांगे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती केज यांनादिलेल्या निवेदनातून ही बाब पुढे आली.

निवेदनात नमूद केल्या प्रमाणे,केज तालुक्यातील काही गावांतील घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्ते मंजूर होत नसल्याच्या तक्रारी आहेत.अनेक लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून बांधकाम अर्धवट अवस्थेत अडकले आहे.यामुळे कुटुंबांना राहण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पत्रात म्हटले आहे.या सोबतच, काही ठिकाणी हप्ते मिळण्यासाठी अवैध पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित अभियंता व संगणक ऑपरेटर यांच्या कडून लाभार्थ्यांकडे पैसे मागितले जात असल्याची तक्रार लोकांकडून होत असल्याचे पत्रात नमूद आहे.गरीब लाभार्थ्यांची अडवणूक थांबवून, त्यांना त्वरित न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.जीवन आबा हांगे यांनी प्रशासनाला इशारा देत,जर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही दिला आहे.त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सर्व पात्रलाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करावेत,अशी मागणी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,उप मुख्य कार्यकारीअधिकारी (ग्रामीण विकास) तसेच संबंधित ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. प्रशासनाकडून चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!