सामाजिक

खा.बजरंग सोनवणे घेणार विकासाच्या ‘दिशा’ चा आढावा,१३ जानेवारी ला होणार मॅरेथॉन बैठक, केंद्र,राज्यांच्या योजनांचा समावेश

बीड/प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना आणि राज्य शासनाच्या विकासात्मक उपक्रमांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी व्हावी,या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत दिशा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा सदस्य व दिशा समितीचे अध्यक्ष खा. बजरंग सोनवणे यांच्या पुढाकाराने ही बैठक होत असून ते विकास कामांचा आढावा घेणार आहेत.

या संदर्भात खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुख,यंत्रणा प्रमुख व अंमलबजावणी अधिकाऱ्यांना दिशा समितीच्या बैठकीस सक्तीने उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.बैठकीदरम्यान केवळ औपचारिक आढावा न घेता,प्रत्यक्ष कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव,निधी वितरण,अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच पुढील कालावधी साठी कृती आराखडा यावर सखोल चर्चा केली जाणार आहे.या बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या १३ महत्त्वाच्या योजना व विभागांचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.

यात प्रामुख्याने नेहरू युवा केंद्र,महिला,बालविकास विभागांतर्गत पोषण, अंगणवाडी व महिला सक्षमीकरण योजना, कौशल्य विकास विभागाच्या प्रशिक्षण व रोजगाराभिमुख योजना, तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते विकास कामांची प्रगती यांचा समावेश आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची सद्यस्थिती,जलजीवन मिशनमधील नळजोडणी व पाणीपुरवठा,तसेच पर्यटन व संस्कृती विभागा अंतर्गत पर्यटनविकासाची कामे यांचाही सखोल आढावा घेतला जाणार आहे.

आरोग्य,उद्योग व सामाजिक योजनांवर विशेष भर

बैठकीत आरोग्य विभागा अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी,संजय गांधी निराधार योजना, एक जिल्हा एक उत्पादन योजनेद्वारे स्थानिक उद्योगांना चालना,तसेच प्रधानमंत्री जनधन अभियानांतर्गत आर्थिक समावेशनाची स्थिती यावरही चर्चा होणार आहे.

अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अद्ययावत अहवाल,प्रगती आकडेवारी,प्रलंबित प्रकरणांची यादी आणि पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, अशा स्पष्ट सूचना खा. सोनवणे यांनी दिल्या आहेत.योजनांची अंमल बजावणी केवळकागदावर न राहता ती थेट लाभार्थ्यां पर्यंत पोहोचली पाहिजे, यावर बैठकीत भर दिला जाणार आहे.

विकासाला गती मिळण्याची अपेक्षा

या दिशा समिती बैठकी मुळे बीड जिल्ह्यातील विकासकामांतीलअडथळे दूर होऊन,योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.विशेषत: ग्रामीण भागातील रोजगार,पायाभूत सुविधा, पाणी,वीज,आरोग्य व निवारा या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!