मानव लोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पा अंतर्गत युवती व महिला मेळावा उत्साहात संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी

मानव लोक संस्थेच्या वतीने संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाअंतर्गत अंबाजोगाई येथे युवक व महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.महिलांचे सक्षमीकरण, आत्मभान आणि हक्कांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास युवक युवतीं सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांनी महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विविध प्रकारांवर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी “एका लग्नाची कोर्टातील गोष्ट” हे सामाजिक आशयाचे नाट्य सादर करण्यात आले.या नाटकाच्या माध्यमातून विवाहातील अन्याय, कायदेशीर बाबी,महिलांचे अधिकार आणिहिंसाचारा विरोधातील उपाययोजना प्रभावीपणे मांडण्यात आल्या. नाट्य सादरीकरणा नंतर युवती व महिलां सोबत खुली चर्चा घेण्यात आली.महिलांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले,तर मार्गदर्शकांनी कायदेशीर मदत व सामाजिक आधार याविषयी सविस्तरमाहिती दिली.
या मेळाव्यात दुसऱ्या मार्गदर्शक म्हणून समता जाधव यांची उपस्थिती लाभली.फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या समता जाधव या हास्य जत्रा थिएटर तसेच चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.त्यांचा नुकताच “कैरी” हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी,संघर्ष आणि त्यावर मात करत कसे पुढे गेल्या याचा प्रेरणा दायी प्रवास महिलांसमोर उलगडला.“कोणतीही महिला कमकुवत नसते ; ती कणखर असते.योग्य संधी,आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर प्रत्येक महिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकते,”असा ठाम संदेश त्यांनी दिला.
मेळाव्याच्या शेवटी महिलांनी मार्गदर्शकांचे अनुभव प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून सामाजिक बदल घडविण्यास बळ मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन मानव लोक संस्थेच्या मनस्विनी महिला प्रकल्पातर्फे करण्यात आले होते.



