निवडणूकसामाजिक

निवडणुकीची रणधुमाळी गावरान तडका : फक्त करमणूक

महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा,नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे वातावरण दिवसेंदिवस तापले गेले असल्याचे दिसते.या निवडणुकीसाठी कोणी तरी एबी फॉर्म मिळवण्या साठी कोणाचे फार्म हाऊसचे दरवाजे तोडले, कोणी आपल्या ऐवजी दुसऱ्याला पक्षाने एबी फॉर्म दिला म्हणून त्याचा फॉर्म हिसकावून घेऊन गिळला परंतु प्रकरण अंगाशी आल्यावर फॉर्म गिळला नसून तो फाडला असल्याचा खुलासा प्रसार माध्यमांसमोर केला,तर कोणी रागाने दुसऱ्याला मिळालेला एबी फॉर्म फाडला.एका घरातील चार सदस्यासाठी काही तरी जुगाड करून चार एबी फॉर्म मिळवले व मात्र त्यानंतर प्रकरण अंगलट आल्यावर माफी मागत त्यापैकी दोन फॉर्म पक्षाकडे परत केले.

या निवडणुकात इतर निवडणुकापेक्षा काहीतरी भलतंच घडलं हे मात्र खरं.काही ठिकाणी वडिलांच्या विरोधात मुलगा उभा राहिला,काही ठिकाणी सासूच्या विरोधात सून उभी राहिली,भावाच्याविरोधात बहीण उभा राहिली, भावाच्या विरोधात भाऊ उभा राहिला.आईच्या विरोधात मुलगी उभी राहिली.अशा प्रकारची आणखी कितीतरी कॉम्बिनेशनस असतील ही.परंतु मेहुणीच्या विरोधात मेहुणा उभा राहिला असे मात्र मला वाचायला किंवा ऐकायला मिळाले नाही ‌हे मात्र खरे.
पुण्यात तर महाभयंकरच घडले.शेवटी आमच्या पुण्याचे काहीतरी वेगळेच म्हणतात ना पुणे तेथे काय उणे !! पुण्यात कोणाला उमेदवारी नाकारल्याने त्याचे अश्रू अनावर झाले, कोणातरी महिलेचे तर डोळेच पांढरे झाले,तिचा जीव जातो की काय ? या कल्पनेने क्षणभर घरातील लोकांचाच जीव जाण्याची वेळ आली,काय करावे आणि काय नाही ? हे त्यांना त्या क्षणी सुचत नव्हते,कोणातरी महिलेचे तिकीट नाकारल्यामुळे अतिव दुःखामुळे ती महिला घेरी येऊन पडली तर कोणी अंगावर राॅकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

एका ठिकाणी तर भयंकरच प्रकार घडला, पती-पत्नीने एकाच जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.पतीने अर्ज मागे घेतल्याशिवाय सासरी नांदायला येणार नाही अशी शपथ घेऊन व तशी तंबी देऊन पत्नीने थेट माहेर गाठले ,तर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही,पत्नी परत आली नाही तरी चालेल परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी ठाम भूमिका घेत पतीने शपथपूर्वक दृढनिश्चय केला असल्याचे समजले आहे.यात खरे किती खोटे किती माहित नाही.

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी,सेवेसाठीची स्वतःचा संसार उध्वस्त झाला तरी चालेल,प्राण गेला तरी बेहत्तर ही भावना मनात बाळगून उमेदवार तसेच त्याचे मित्र मंडळ व नातेवाईकांची चाललेली ही मनापासून ची समाजसेवेची तळमळ पाहिली की माझ्या सारख्या निर्मळ मनाच्या व भोळ्या,भाबड्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात व अंगावर शहारे येतात,मन भरून येते, दिवसेंदिवस लोकशाही अधिक समृद्ध,दृढ व घट्ट होत आहे हे पाहून अक्षरशः अंतकरण हेलावते व क्षणभर डोळ्यात आनंदाचे व अभिमानाने अश्रू येतात धन्य ते लोक व धन्य ती लोकशाही.

या निमित्ताने शेवटी जनसामान्यांना एकच विनंती करतो की माणसे ओळखायला शिका,नाही तर तुमची आयुष्यभर फसगत व फरपट झाल्या शिवाय राहणार नाही.
या निवडणुकीच्या माध्यमातून नवनवीन फंडे व नवनवीन प्रकार पाहायला व ऐकायला मिळाल्यामुळे सर्व सामान्यांची करमणुक व मनोरंजन मात्र निश्चितच झाले आहे.

संकलन व संकल्पना:
प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख,पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!