सामाजिक

मनोविकार तज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती ; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती नुकत्याच वडवणी तालुक्यातील देवडी येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण व पत्रकार गुणगौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले.या निवडीमुळे अंबाजोगाई सह संपूर्ण जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असून सर्व स्तरातून डॉ. इंगोले यांचे अभिनंदन केले जात आहे.

डॉ.राजेश इंगोले हे गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या राज्यस्तरीय संघटनेचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.या माध्यमातून त्यांचा राज्यभर व्यापक संपर्क निर्माण झाला असून वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. समाजोपयोगी कार्याची हीच तळमळ त्यांच्या कार्याची ओळख ठरली आहे.

या सामाजिक बांधिलकीतूनच सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी घनिष्ठ नाळ जुळली.मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून कार्य करताना त्यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली. परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विविध आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये डॉ.इंगोले यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. या शिबिरांच्या माध्यमा तून अनेक पत्रकारांच्या आजारांचे वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार व सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

डॉ.इंगोले यांच्या कार्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी वेळोवेळी कौतुक केले असून,त्यांनी राज्य पातळीवर अधिक व्यापक स्वरूपात कार्य करावे, असा आग्रह सातत्याने धरला होता.त्याच अनुषंगाने देवडी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या कार्याची दखल घेत वैद्यकीय कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे,पद्मश्री पोपटराव पवार,मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अ.भा.म.प.अध्यक्ष मिलिंद अष्टीकर,मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे तसेच ज्येष्ठपत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते डॉ.राजेश इंगोले यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

डॉ.राजेश इंगोले यांच्या या निवडीमुळे मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाला राज्य पातळीवर नवी दिशा मिळणार असून, पत्रकारांच्या आरोग्य विषयक उपक्रमांना अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!