बीडच्या डॉ.विक्रांत आंधळे यांचे राष्ट्रीय पात्रता (NET) परीक्षेत यश ; ६० हजार विद्यार्थ्यां मधून मारली बाजी

बीड/प्रतिनिधी
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR),नवी दिल्ली अंतर्गत कृषी वैज्ञानिक चयन मंडळा द्वारे (ASRB) आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (NET- 2025) बीडचे सुपुत्र डॉ.विक्रांत तुकाराम आंधळे यांनी ‘पशु पोषण शास्त्र’ (Animal Nutrition) विषयात दैदिप्यमान यश संपादन केले आहे.देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यंदा संपूर्ण भारतातून सुमारे ६० हजार विद्यार्थी बसले होते,त्यापैकी केवळ ६ हजार विद्यार्थी पात्र ठरले असून,त्यात डॉ.विक्रांत यांनी आपले स्थान निश्चित करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
डॉ.विक्रांत हे बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम आंधळे यांचे सुपुत्र आहेत.त्यांनीआपले पशुवैद्यकीय पदवीचे (B.V.Sc.) शिक्षण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले,तर पदव्युत्तर पदवीचे (M.V.Sc.)शिक्षण ओडिसा पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.वडिलांच्या शैक्षणिक वारसा पुढे चालवत त्यांनी अत्यंत जिद्दीने अभ्यास करून ‘पशु पोषण शास्त्र’ सारख्या कठीण विषयात हे यश मिळवले आहे.
या पात्रता परीक्षेतील यशामुळे डॉ.विक्रांत आंधळे आता देशभरातील विविध कृषी व पशु वैद्यकीय विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ पदासाठी च्या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून,पशु वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व बीड जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य दिशा आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे,असा आदर्श त्यांनी आपल्या कामगिरी तून घालून दिला आहे.



