
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग सातवीत अ च्या ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका श्रीमती सिंधुताई चव्हाण होत्या,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक साळुंके सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रोकडे एस. व्ही यांनी केले.या उपक्रमांतर्गत वर्ग सातवी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनीविविध मान्यवर लेखकांची पुस्तके स्वखर्चाने जमा करून वाचन संस्कृतीला चालना दिली आहे.वर्ग ग्रंथालयाची जबाबदारी ग्रंथपाल म्हणून सोफियान पठाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सर्व पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राध्यापक साळुंके सर म्हणाले की,“पुस्तक वाचन हे विज्ञाननिष्ठ, सत्याधारित आणि विश्वसनीय माहिती देणारे असावे,तरच वाचनाचा खरा लाभ मिळतो.” विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन विचारशक्ती विकसित व्हावी,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती सिंधुताई चव्हाण यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वाचन संस्कृती जोपासावी,असे आवाहन केले.कार्यक्रमाचासमारोप रोकडे एस.व्ही यांनी केला.हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.



