गुन्हेगारी

केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली ग्रामपंचायतीच्या सरपंचाची बोगस सही करून राबवली निविदा प्रक्रिया,बोगस सही करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलीस निरिक्षकांकडे सरपंचाची तक्रार सरपंचाची बोगस सही करणारा तो व्यक्ती कोण? 

केज/प्रतिनीधी

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली ग्रामपंचायतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरपंचांची बनावट (खोटी) सही करून निविदा (टेंडर) प्रक्रिया राबवण्यात आल्याची गंभीर तक्रार दहिफळ वडमाउलीच्या सरपंच सौ.अनिता शशिकांत गदळे यांनी केज पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली असून सबंधित प्रकाराची चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

केज तालुक्यातील ग्रामपंचायत दहिफळ वडमाऊली अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये डी.पी.डी.सी निधीतून एक शाळा खोली बांधकाम मंजूर झाले होते.या कामाचा प्रशासकीय आदेश दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राप्त झाला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर कु.प्रिती हरिदास तांबडे रा.शिरूर घाट यांनी टेंडर प्रक्रियेस लागणाऱ्या कागदपत्रासाठी सरपंचास कसलीही कल्पना न देता सरपंचाची स्वाक्षरी पूर्णपणे बोगस केली आहे.

सदरील टेंडर प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर आपण सही केली नसल्याचे सरपंच सौ.अनिता शशिकांत गदळे यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.तसेच त्यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की,प्रशासकीय अधिकाऱ्याची यामध्ये निव्वळ फसवणूक केली असून बनावट कागद पत्रांच्याआधारे शासकीय निधीचा गैरवापर करण्यासाठीच हा अट्टाहास असून काही अधिकाऱ्याच्या संगनमताने सरपंचांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम या माध्यमातून केले आहे. सदरील गैरप्रकार कोणी केला, याचा योग्य तो पोलिस तपास करून सबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईकरण्याची मागणी केली आहे.

सदरील तक्रारीची प्रत आ.नमिताताई मुंदडा, जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांना पाठवण्यात आली आहे.दरम्यान एका बाजूला पारदर्शक कारभाराचा आव आणणारे जिल्हा प्रशासन थेट सरपंचाची बोगस स्वाक्षरी करून बोगसगिरी करणाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सदरील प्रकरणात माझ्या परस्पर माझी खोटी सही करणाऱ्या आणि करायला लावणाऱ्या संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा.‌

सौ.अनिता शशिकांत गदळे सरपंच दहिफळ वडमाऊली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!