
केज/प्रतिनिधी
लाडेगाव,दिपेवडगाव व लाडेवडगाव या गावांतील कृषि पंपधारक शेतकऱ्यांना दररोज किमान आठ तास अखंडित आणि उच्च दाबाने वीजपुरवठा द्यावा, अन्यथा तीव्र बेमुदत आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.या मागणी साठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी अंबाजोगाई विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चाटे यांना सोमवारी दि. ८ डिसेंबर रोजी निवेदन सादर केले.
होळ येथील ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्रा तून लाडेगाव, दिपेवडगाव आणि लाडेवडगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा केला जातो.मात्र गेल्या काही दिवसांपासून या गावांमध्ये गंभीर स्वरूपाची लोडशेडिंग होत असून,सुमारे ३० ते ३६ तासाच्या खंडानंतर केवळ सहा तास वीज पुरवठा दिला जातो,तेही अत्यंत कमी दाबाने,अशी तक्रार शेतकऱ्यांनी निवेदनात मांडली आहे.
यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाची व्यवस्था कोसळली असून,पिकांना आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात वाळवी लागण्याची भीती निर्माण झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, परिसरात महा वितरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या गंभीर अडचणी लक्षात घेऊन, दररोज अखंडित आठ तास उच्च दाबाने शेती पंपांना वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी कुलदिप करपे यांनी निवेदनात केली.पुढील तीन दिवसांत वीज पुरवठ्याची स्थिती सुधारली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली होळ ३३ के.व्ही.उपकेंद्र व उपअभियंता कार्यालया समोर बेमुदत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी संघटना सर्वतोपरी साथ देईल,असेही करपे यांनी सांगितले.महा वितरण कडून आता या निवेदना वर काय पाऊल उचलले जाते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



