सुरक्षित केज शहरासाठी नागरिक,पोलीस एकदिलाने पुढे! शिक्षक कॉलनीतील उपक्रमाचे पोलीस दलाकडून कौतुक

केज/प्रतिनिधी
केज शहरातील शिक्षक कॉलनी येथे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या संध्याकाळच्या राऊंड उपक्रमाला स्थानिक पोलीस दलाने मोठा प्रतिसाद दिला असून या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून नागरिकांना प्रोत्साहन दिले.परवा रात्री गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने, बाळासाहेब अहंकारे, काजी यांच्यासह पोलीस पथकाने शिक्षक कॉलनी तील नागरिकांनी सुरू केलेल्या सुरक्षा राऊंड मध्ये सहभाग घेतला.
यावेळी उनवने साहेबांनी नागरिकांच्या सतर्कतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.आपले पोलीस दल तुमच्या सुरक्षेसाठी 24×7 तत्पर आहे.आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असे आश्वासक शब्द त्यांनी उपस्थितांना दिले.
केज वासीयांसाठी केलेल्या कळकळीच्या आवाहनात त्यांनी सांगितले की,सुरक्षित केजसाठी नागरिक, पोलीस सहकार्य अत्यावश्यक आहे. शिक्षक कॉलनीप्रमाणे शहरातील इतर भागांनीही स्वयंस्फूर्तीने रात्रीचे संध्याकाळचे राऊंड सुरू करावेत.तसेच परिसरातील संशयित व्यक्ती व वाहनांची माहिती त्वरित पोलिसांना देऊन सुरक्षा साखळी अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांनी दाखवलेल्या या सतर्क उपक्रमामुळे केजमधील नागरी सुरक्षेला नवी दिशा मिळत असल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.



