
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जीवाचीवाडी गावातील पोखरा योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप करत गावा तील सुभाष सखाराम सारुक यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.
संबंधित योजनेतील निधीचे नियोजन चुकीचे होत असून प्रत्यक्षात कोणतीही कामे न करता कागदोपत्री खर्च दाखवला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.तक्रारदार सुभाष सारुक यांनी आरोप केला की,पोखरा योजनेंतर्गत कोणताही ग्रामसभा निर्णय न घेता गावाच्या सचिवांनी स्वतःच कामांचे आदेश दिले.यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. अनेक वेळा ग्रामसभेची मागणी करूनही सचिवांनी ग्रामसभा न घेता मनमानी कारभार केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अन्यथा उच्चस्तरीय कार्यालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा सुभाष सारुक यांनी दिला आहे.



