
केज/प्रतिनिधी
केज पंचायत समितीच्या प्रांगणात सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या चार मजली दोन व इतर दोन अशा चार भव्य इमारती गेली तीन वर्षापासून केवळ वीज फिटिंग व जोडणी अभावी धूळ खात पडल्या आहेत. सध्या शासनाच्या दुर्लक्षा मुळे या इमारती गुन्हेगारी व अवैध बाबींच्या अड्डे बनल्या आहेत.
या इमारती प्रशासनाने तात्काळ संबंधित गुत्तेदाराकडून वीजपुरवठा काम पूर्ण व पंचायत समितीकडे हस्तांतरित करून अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी राहण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने मंगळवारी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले.
केज पंचायत समितीच्या जागेत सभापती,अधिकारी व कर्मचारी यांना राहण्या साठी प्रचंड खर्च करून गेली तीन वर्षापासून भव्य व सुसज्ज इमारती बांधल्या गेल्या.बांधकाम ही वेळेत पार पडले.मात्र त्यानंतर वीज फिटिंग व जोडणीचे काम वेळेत पूर्ण न होऊ शकल्याने या इमारती गेली तीन वर्षा पासून बेवारस अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत. केवळ वीज फिटिंग काम न झाल्याने या इमारती केज पंचायत समितीकडे हस्तांतरित होऊ शकल्या नाहीत.
मध्यंतरीच्या काळात या इमारतीकडे कोणाचेही लक्ष न राहिल्याने अज्ञात,टुकार व गुन्हेगारी टोळक्यांनी या इमारतीचा आश्रय घेवून सिगारेट,दारू पिणे, जुगार यासह इतर अवैध धंद्यासाठी या इमारतींचा वापर सुरू केला.या सर्व इमारतींच्या खिडक्यांचा काचा व कांहीं दरवाजेही तोडफोड करण्यात आली. गेली तीन वर्षात या इमारतींचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे.
शासकीय संपतीकडे अधिकारी व कर्मचारी किती बेफिकीर वृत्तीने वागतात हे यावरून सिद्ध झाले आहे.स्वतःच्या पैशातून उभा केलेल्या इमारतीकडे असे कोणी पाहिले असते का? एवढी वर्षे जबाबदार अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर माहिती पाठवून पाठपुरावा केला असता तर हे काम खूप लवकर पूर्ण होऊन जनतेच्या पैशाचा हा अपव्यय व नुकसान टाळता आले असते.
केज विकास संघर्ष समिती गेली तीन वर्षे यासाठी पाठपुरावा करून या इमारती तात्काळ राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याची वेगवेगळ्या निवेदने व आंदोलनाद्वारे करत आहे.याही वेळी समितीने प्रशासनाकडे रीतसर निवेदन देऊन मागणी केली होती.मात्र प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने समितीने मंगळवारी केज पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश द्वाराला कुलूप ठोकले.
अखेर केज पंचायत समिती प्रशासनाने येत्या 31 डिसेंबर पूर्वी या इमारतीचे प्रलंबित काम पूर्ण करून राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात समितीचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे सहभागी होते.निवेदनावर हनुमंत भोसलेनासेर मुंडे,शेषराव घोरपडे,महेश जाजू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



