
केज/प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय,अंबाजोगाई या संस्थेकरीता अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आले आहे.या मंडळाच्या अध्यक्षपदी बीडचे खा. बजरंग सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हा निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने घेतला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई या संस्थेत अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहून रुग्णालयाच्या व्यवस्थापनांत सुधारणा करण्यासाठी मार्ग व साधने तयार करणे, निरनिराळ्या कामासाठी व विभागांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक तरतूदींचा योग्य प्रकारे वापर होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे रुग्णालय संबंधीच्या जनतेच्या तक्रारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होण्यासाठी करावयाच्या पध्दतीबद्दल शिफारस करणे, रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची अनियमित उपस्थिती,अवक्तशीरपणा व गैरवर्तन इत्यादींबाबत आढावा घेणे व त्यांत सुधारणा व्हावी म्हणून शिफारस करणे.रुग्णालय परिसराची तपासणी करणे,सर्वसाधारण कामकाजांचा अभ्यास करणे व दोषआढळल्यास ते दूर करण्यासाठी उपाय सुचविणे.
रूग्णालयासाठी जनतेकडून देणग्या नियंत्रित करणे, गोळा करणे व स्विकारणे व राज्य शासनास रुग्णालया साठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही अशा विशेष बाबींसाठी त्या उपयोगात आणणे, कोणती देणगी स्विकारण्या मध्ये अथवा तिचा रुग्णालयासाठी उपयोग करताना अंमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भंग होता कामा नये.उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समितीच्या कामकाजामध्ये आवश्यक त्या पध्दती विहीत करणे व इतर आवश्यक त्या गोष्टी करणे.
आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमल बजावणीचा आढावा घेणे आदी विषयांसाठी अभ्यागत मंडळ गठीत करण्यात आलेले असून खा.बजरंग सोनवणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन महिन्याला खा.सोनवणे घेतील बैठक
१) समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलविण्यात येणार आहे.अध्यक्षांनी निर्देशित केल्यास,अधिक वेळा बैठक बोलविता येईल.
२) कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होईल,परंतु सदस्य योग्य व सबळ कारणांसाठी अनुपस्थित राहिला असल्यास सभासदत्व पुढे चालू ठेवण्यास शासन अनुमती देईल.
३) समितीच्या प्रत्येका बैठकीची आगाऊ सूचना बैठकीच्या दिनांकापासून १० दिवस अगोदर बैठकीच्या कार्यसूचीसह समिती सदस्यांना पाठविण्यात येईल.
४) संचालक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन,मुंबई यांना समितीच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचा हक्क राहील व त्या उपस्थितीच्या वेळी त्यांना समितीच्या सदस्यांचे हक्क व दर्जा प्राप्त असेल.
५) समितीच्या बैठकीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुबई यांना समितीच्या सदस्य सचिवांनी बैठकीच्या दिनांकापासून एक आठवड्याच्या आत पाठवावा.



