
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील गौरवाडी येथील दलित वस्तीतील रहिवासी रामा लक्ष्मण दुनघव यांनी आपल्या कुटुंबासह तसेच गुरं-जनावरां सहीत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यावस्तीला जाणारा पारंपरिक रस्ता अडवल्याने आणि पाण्याचा पुरवठा बंद केल्याने वस्तीतील सुमारे २०० नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रामा दुनघव यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार केज यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती.परंतु शासनाकडून त्याचा पाठ पुरावा झाला नाही त्यांनी प्रशासनाला दि.२८ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने,आज त्यांनी अखेर आमरण उपोषणा ला सुरुवात केली.
रामा दुनघव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की,“माझे वडील लक्ष्मण वडजु दुनघव यांनी सर्वे नं. ११२/२ मधील काही जमीन विकत घेऊन तिथे आम्ही वस्ती केली.आज ही वस्ती साधारण २०० लोकसंख्येची असून, मुख्यत्वे दलित समाजा तील कुटुंबे येथे राहतात. वडीलोपार्जित रस्ता, पाणी व वीज यासारख्या मूलभूत सुविधा तयार केल्या आहेत.मात्र काही व्यक्तींनी राजकीय वैरातून आमचा रस्ता अडवला, पाईपलाइन फोडली आणि रस्त्यावर झाडे लावून वाहतुकीचा मार्गच बंद केला.
अर्जदाराने आपल्या तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींची नावेही दिली असून,हे सर्व लोक वारंवार आमच्यावर जातीवाचक शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण करतात.तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही जाणूनबुजून बंद करण्यात आला आहे,असेही दुनघव यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,तहसील प्रशासनाने तात्काळ चौकशी करून रस्ता वहीवाटीसाठी खुला करावा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.या सर्व प्रकरणात आम्ही न्याय मागत असून जातीभेदाच्या कारणा वरून आमच्यावर अन्याय होत आहे.
सदर घटनेमुळे गौरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दलित वस्तीतील नागरिकांनी सामाजिक न्याय मिळे पर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन, गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी न्याय तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.



