
वडवणी / प्रतिनिधी
डॉ.संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आज वडवणीयेथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.“पोटाच्या प्रश्नावर लढणारे आम्ही, पण आज न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे,” अशा भावना व्यक्त करत आंदोलकांनी शासन व न्यायव्यवस्थेच्या भूमिके विरोधात संताप व्यक्त केला.
या आंदोलनात डॉ.संपदा मुंडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक,स्थानिक नागरिक तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलना दरम्यान “संपदाला न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही”, “न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील” अशा घोषणा देत वातावरण दणाणून गेले.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई मोहन गुंड यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.त्यांनी सांगितले की, “राज्यकर्त्यांना न्याय व्यवस्थेकडे न्याय मागावा लागतो,हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे.डॉ. संपदा मुंडेच्या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील.”यावेळी डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनीही भावनिक आवाहन करत म्हटले की, “ही लढाई केवळ एका कुटुंबाची नाही,तर प्रत्येक अन्यायग्रस्त स्त्रीच्या न्यायाची लढाई आहे.”
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा करून रस्ता मोकळा करून दिला.तरीही नागरिक आणि सामाजिक संघटनांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत डॉ.संपदा मुंडे प्रकरणी निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत न्यायासाठीचा संघर्ष अखंड सुरूच राहणार आहे.या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळानेही पाठिंबा दिला आहे असे शेकापचे राज्य सर चिटणीस भाई मोहन गुंड यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



