राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेत बक्षीस वितरण सोहळा संपन्न


केज/प्रतिनिधी
केज येथील शाळेत ७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त झालेल्या विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग घेतल्याबद्दल बक्षीस वितरण सोहळा स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेत मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील खिलाडूवृत्ती जोपासण्या साठी या स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशोक डांगे यांनी भूषविले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर जी.बी.गदळे सर सचिव, स्वामी दयानंद प्रतिष्ठान, नवाबसाहेब सय्यद कोषाध्यक्ष,स्वामी दयानंद प्रतिष्ठान,हनुमंत भोसले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, बालासाहेब गाढवे नगरसेवक,बी.डी. चौधरी सेवानिवृत्त शिक्षक तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका बी.बी.चाटे व पालक प्रतिनिधी अशफाक सय्यद यांची उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. “खेळामुळे शारीरिक सुदृढता येतेच,पण त्या सोबतच जीवनात शिस्त आणि संघभावना निर्माण होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच त्यांनी यशस्वीविद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विविध मैदानी खेळात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक आर. एस.क्षीरसागर, जी.बी. डिरंगे,श्रीमती अनिता जाधव आणि ध्वजा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अतिशय नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी.यादव यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी जे.आर.मस्के यांनी उपस्थित सर्व मान्यवर,पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.



