
अंबाजोगाई/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बळीरामजी सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा निघणार असल्याची माहिती जिल्हा मंत्री आप्पाराव यादव यांनी दिली.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात यादव यांनी पुढे म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात वारंवार विनंती करूनही समस्या सुटत नसल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग संतप्त झाला असून, त्यांनी पी एम व सीएम सन्मान निधीत दुप्पट वाढ करावी,सन २०२५ मध्ये खरीप हंगामात जाहीर केलेला १७५०० रुपयांचा विमा त्वरित द्यावा, खेड्यातील पांदण रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करून येत्या खरीप हंगामापूर्वी पूर्ण करावीत, २०२५ च्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले ते तात्काळ बुजविण्यात यावेत,गाव जोड रस्ते,ग्रामीण मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाचे तात्काळ मजबुतीकरण करावे,सोलार पंप करिता ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी हिस्सा भरलेला आहे. त्यांचे सोलार पंप तात्काळ बसवावेत,सध्या पारंपारिक ऊर्जेचे कोटेशन देणे बंद केले आहे ते भरून देऊन तात्काळ कनेक्शन द्यावे, पूर्ण दिवसभर बारा तास विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने सातत्याने द्यावा,विद्युत वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळालेला आहे त्याची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी,प्रवाही सिंचनाची वाढवलेली पाणीपट्टी कमी करण्यात यावी,पैठण उजव्या कालव्याच्या वितरिका, उपवितरिका,लघु वितरिकांचे टेल पर्यंत लाइनिंग करून द्यावी, यासाठी संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांच्या नावावरून कमी करावी, सर्व शेतमालाची शासकीय हमीभावाने खरेदी बारा महिने चालू ठेवावी, गोदावरी नदीवरील राजा टाकळी,ढालेगाव,तपे निमगाव, रामपुरी, बबूलतारा व इतर शिवारातील संपादित क्षेत्राचा मोबदला विना विलंब द्यावा, शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज सरसकट मार्च २०२६पूर्वी माफ करण्यात यावे,महा डीबीटी पोर्टल वरील निवड करण्यात आलेले वाहने व इतर यांत्रिकी कारणासाठी निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात यावी,शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या यांत्रिकी करणाची अनुदानित रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी,पी एम किसान सन्मान निधीच्या काही लाभार्थ्याची रक्कम खात्यावर येणे बंद केले आहे ती पूर्ववत सुरू करावी, २०१९ पूर्वीचे फेरफार असणारे हजारो शेतकरी पीएम व सीएम किसान निधी पासून वंचित आहेत त्यांना सन्माननिधी लवकरात लवकर सुरू करावा, भूमीहीन लोकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य देण्यात यावे,सुशिक्षित बेकार व बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा,वन्य प्राण्यांना वनखात्याकडून बंदोबस्त करावा अन्यथा वन्य प्राण्यांनी शेती पिकाचे जे नुकसान केले त्याचे नुकसान भरपाई सात दिवसात मिळावी,वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून मागील त्याला ९०% अनुदानावर कुंपण द्यावे, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे,अशा मागण्या भारतीय किसान संघाने केल्या असून या मागण्या २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सोडविण्यात याव्यात अन्यथा नाईलाजाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या कार्यालयावर भारतीय किसान संघ जिल्हा शाखा बीड च्या वतीने मोर्चा काढण्यात येईल त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील असा गर्भित आप्पाराव यादव यांनी इशारा ही दिला आहे.
या निवेदनावर भारतीय किसान संघाचे पदाधिकारी तुकाराम चोपडे,बाळासाहेबभोजने, प्रकाश कुलकर्णी,अशोक तौर, भीमराव शिंदे, ज्ञानेश्वर घोलप,काशिनाथ आदमोरे, अशोक मस्के, भास्कर आगे,गोवर्धन कर्डिले,साधू जाधव, सौ.प्रेमाताई यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



