अध्यात्मिक

केज येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन व १०८ कुंडी महा विष्णु महायज्ञाचे आयोजन

केज/प्रतिनिधी

केज शहरातील भगवान श्रीकृष्ण आश्रम,बीड रोड येथे श्रीकृष्ण मंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळ्या निमित्त १०८ कुंडी भव्य महाविष्णु याग,तसेच ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.हा धार्मिक कार्यक्रम बुधवार दि.११ मार्च २०२६ ते गुरुवार दि.१९ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या महा विष्णु यज्ञ,राम कथा व किर्तन सोहळ्या साठी हिमाचल प्रदेश येथील महंत तपस्वी परमहंस श्री १००८ स्वामी चिन्मय पुरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.संगीत रामकथा प्रवक्ते श्री.ह.भ. प. रामराव महाराज ढोक करणार असून दररोज सकाळी ८ ते ११ वाजता महाविष्णु १०८ कुंडी यज्ञ दुपारी २ ते ५ संगीत तुलसी रामायण कथा,सायंकाळी धार्मिक विधी, कीर्तन व हरि जागराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात विविध संत-महात्म्यांची कीर्तन सेवा लाभणार असून भाविकांसाठी दररोज महाप्रसाद व अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.परिसरातील सर्व भाविकांनी व धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पुण्यलाभाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भागवत भुषण श्री.ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम परिवार यांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी भाविकांनी आयोजकांशी संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे. दरम्यान यज्ञ मंडपाचे काम पुर्णत्वास आले असून राजस्थान येथील कारागीर मंडप उभारणी करण्यात मग्न आहेत. १०८ यज्ञ कुंड तयार करण्यात आले असून त्यांना गोमूत्र,गोमय, मृतीका यांनी सारवण करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे.श्रीराम कथा मंडपाचे काम पुर्णत्वास आले असून भोजन मंडपाचे काम गतीने सुरू आहे अशी माहिती भगवान श्री कृष्ण आश्रम येथील आयोजक भागवत भुषण ह.भ.प. श्री. केशव महाराज शास्त्री यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!