सामाजिक

गप्पेवाडीत मृत्यूचा सापळा! जमिनीला टेकलेल्या वीजतारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात ; महावितरणचा बेजबाबदारपणा टोकाला

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील गप्पेवाडीयेथील बाराभाई वस्ती ते महादेव वस्ती दरम्यान महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे.येथील उच्च दाबाच्या (३-फेज) वीज तारा अक्षरशः जमिनी लगत लोंबकळत असून, कधीही मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही विडा उपकेंद्रातील अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी परिस्थिती काय?

गप्पेवाडीतील या मुख्य मार्गावर बाराभाई वस्ती पासून महादेव वस्तीपर्यंत विजेच्या तारा अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत.या तारा इतक्या खाली आल्या आहेत की, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या डोक्याला त्या कधीही स्पर्श करू शकतात.या परिसरात अहोरात्र वर्दळ आहे.याच मार्गावरून लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि शेतकरी आपल्या जनावरांसह ये-जा करतात.तसेचभाविकांचा राबता जवळच मंदिर असल्याने महिला आणि वयोवृद्धांची येथे मोठी गर्दी असते.पावसाळा तोंडावर असल्याने जमीन ओलसर होऊन विजेचा प्रवाह जमिनीत उतरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाची गाढ झोप आणि ग्रामस्थांचा संताप

मिळालेल्या माहिती नुसार,ग्रामस्थांनी या गंभीर समस्येबाबत विडा उपकेंद्र येथील महा वितरण कार्यालयात अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र,ढिम्म प्रशासनाने अद्याप याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार काय?असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.आम्ही रोज जीव मुठीत धरून येथून प्रवास करतो.महावितरण च्या अधिकाऱ्यांना अनेकदा सांगितले,पण ते याकडे दुर्लक्ष करत आहेत.जर उद्या एखादी दुर्घटना घडली,तर त्याला जबाबदार कोण?असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत.

आंदोलनाचा इशारा

महावितरणच्या या जीवघेण्या निष्काळजी पणामुळे गप्पेवाडीकर आता आक्रमक झाले आहेत.जर येत्या दोन – तीन दिवसांत या वीज तारांची दुरुस्ती करून त्या उंच करण्यात आल्या नाहीत, तर विडा उपकेंद्रा वर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला महावितरण प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल,असेही गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.आता तरी महा वितरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन मृत्यूचा हा सापळा हटवणार की पुन्हा एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार,हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!